शाळेच्या आवारात उभारले 'गाव'; शाळा सुरू झाल्यावर मुले घेणार गावची मजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 04:41 PM2021-06-13T16:41:29+5:302021-06-13T16:41:44+5:30
ओसाड जागेतही फुलवली वनराई
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : लॉकडाऊनमुळे गावी न जाऊ शकलेल्या आणि ज्यांना गाव नाही अशा विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यावर आता गावची मजा घेता येणार आहे. लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग करत श्रीरंग शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाने विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात 'गाव' उभारले आहे तर विद्यार्थ्यांना देशी झाडांची ओळख व्हावी म्हणून शाळेच्या मागील ओसाड जागेत तब्बल ३०० झाडे लावून विद्यार्थ्यांना शेती कशी करावी याचे धडे दिले जाणार आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि सर्व शाळा कुलूपबंद झाल्या. ऑफलाईन शिक्षण ऑनलाइन सुरू झाले. शाळेत आल्यावर या विद्यार्थ्यांना निसर्गाची जवळून ओळख व्हावी तसेच, गावाविषयी ओढ निर्माण व्हावी, गावात आल्यासारखे वाटावे यासाठी श्रीरंग शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सरचिटणीस प्रमोद सावंत यांनी आपल्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू वापरून शाळेच्या आवारात गाव उभारले. यात टुमदार घर, पाट, हौद, तुळशीवृंदावन हे सर्व त्यात पाहायला मिळत आहे. आजकाल शहरात वाढलेल्या मुलांना 'गाव' या संकल्पनेची ओळख करून देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न असल्याचेही सावंत म्हणाले. या टुमदार घरासाठी त्यांनी जुनी लाकडे वापरली आहे आणि त्या घराला गावाच्या घराचा रंग दिला आहे. त्याचप्रमाणे शाळेमागील आवारात त्यांनी तब्बल ३०० देशी वृक्षांचे रोपण करून वनराई फुलवली आहे. शाळेमागे असलेल्या या ओसाड जागेत रॅबिट आणि नाल्यातील कचरा टाकून तेथे घाणीचे साम्राज्य पसरले होते. शाळेने तेथील ७० ते ८० ट्रक रॅबिट काढून त्याठिकाणी सुरुवातीला मिरच्या, टोमॅटो, कारले या भाज्यांची लागवड केली. त्यानंतर हळूहळू वांगी, केळी, आंबा, सोनचाफा, चिकू, कॅन्सर फ्रुट (हनुमान फळ), गोल्डन शॉवर, इलायची, ओवा, तुतीन ते चा प्रकारांची तुळस, नारळ, जांभूळ, कढीपत्ता यांसारखी विविध झाडे त्यांनी लावली आहेत. यापुढे औषधी वनस्पती आणि पालेभाज्या लावण्याचा मानस असल्याचे सावंत यांनी सांगितले.