अनलॉकमध्येही शाळा राहणार लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:36+5:302021-06-16T04:52:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाची पहिली लाट आली तेव्हापासून शाळा बंदच आहेत. राज्यातील अनेक शहरांत रुग्णांची संख्या कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाची पहिली लाट आली तेव्हापासून शाळा बंदच आहेत. राज्यातील अनेक शहरांत रुग्णांची संख्या कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरू झाले असले, तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतलेला नाही. त्यामुळे अनलॉकमध्येही शाळा लॉकच राहणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइनच शिक्षण घ्यावे लागणार आहे.
कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. मार्च महिन्यापासून परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र अनेक शाळांनी परीक्षा रद्द करून शाळेला सुट्टी दिली. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार नाही, तसेच विद्यार्थ्यांना लागण होऊ नये यासाठी शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. पहिली लाट जून २०२० मध्ये ओसरत आल्याने शाळा सुरू होणार अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात सरकारने निर्णय घेतलाच नाही. ऑक्टोबरनंतर शाळा सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे शाळा सुरू होणे लांबणीवर पडून परीक्षाही रद्द करण्यात आल्या. आता दुसरी लाट ओसरून अनलॉक सुरू झाले आहे. सर्व व्यापार सुरू झालेले आहेत. मात्र शाळा बंदच आहेत. त्याचे कारण, तिसरी लाट जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात येऊ घातली आहे. या लाटेत लहान मुले बाधित होतील, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शाळा सुरू केल्या आणि मुले बाधित झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यावर नियंत्रण कसे मिळविणार? त्यापेक्षा तिसऱ्या लाटेचे परिमाण पाहूनच शाळा सुरू करायच्या की नाहीत, याचा निर्णय सरकारने घेणे अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी प्रतीक्षा करण्यावाचून पालकांसह मुलांना आणि शाळेलाही पर्याय नाही. तिसऱ्या लाटेपासून मुले वाचवायची असल्यास शाळा बंदच ठेवणे उचित राहील, असे जाणकारांचे मत आहे. शाळा सुरू नसल्या तरी मुलांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. तरीही शाळेकडून आधीएवढेच शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात असून, त्याचे शंभर टक्के निवारण सरकारी यंत्रणांकडून केले जात नाही. त्यामुळे पालक आणि शाळा यांच्यात अनेक ठिकाणी वाद उफाळून आला आहे.
--------------------
गुरुजींची शाळा सुरू आहे
ऑलनाइन शिक्षण सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षकांना जोडून घ्यावे लागते. त्यांना ऑनलाइन धडे द्यावे लागतात. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे त्यांच्या पाठीशी असतात. त्यांच्याकडून मुलांना उत्तरे सुचविली जातात. गुरुजींना तंत्रप्रेमी व्हावे लागते. अनेक ठिकाणी नेटवर्क कमजोर असते. एखादा विद्यार्थी ऑफलाइन होतो. कधी विजेची समस्या असते. त्यामुळे नेट बंद असते. या सगळ्य़ा गोष्टींवर मात करीत विद्यार्थ्यांपेक्षा जास्त डोकेदुखी गुरुजींची असते. विद्यार्थ्यांला नीट समजले आहे की नाही, हे ऑनलाइनपेक्षा चालू वर्गात जास्त समजू शकते.
---------------------
शाळा सुरू करायची म्हटली तर..
शाळा सुरू करायची म्हटली तर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शाळा निर्जंतुकीकरण कराव्या लागतील. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटायझरची सोय केली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क द्यावा लागेल अथवा सक्ती करावी लागेल. अनेक शाळांमध्ये वर्गखोल्या कमी आणि विद्यार्थीसंख्या जास्त आहे. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार, असा प्रश्न आहे. तसेच लहान मुलांसाठी लसच आलेली नाही. त्यांचे लसीकरण झालेले नाही.
---------------
राज्य सरकारकडून ठोस निर्देश येत नाहीत, तोपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. मात्र महापालिकेच्या शाळांतील जवळपास ४० टक्के विद्यार्थ्यांकडे अत्याधुनिक मोबाइल आणि नेटची सुविधा नसल्याने त्यांचे शिक्षण ऑनलाइन होऊ शकत नाही. खाजगी शाळेतील किती विद्यार्थी ऑनलाइन असू शकतात याची नेमकी माहिती उपलब्ध नाही.
- जे. तडवी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, केडीएमसी
-----------------
खाजगी आणि सरकारी एकूण शाळा - ३१८
एकूण विद्यार्थी - १,१७,९२५
एकूण शिक्षक - ३,३३२
-----------------