पालिका शाळा मुख्याध्यापकांविना
By Admin | Published: December 28, 2015 02:40 AM2015-12-28T02:40:56+5:302015-12-28T02:40:56+5:30
ठाणे महापालिकेच्या शाळांची पटसंख्या ३१ हजारांवर आली असताना या विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शाळेचा टक्का वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांची पटसंख्या ३१ हजारांवर आली असताना या विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शाळेचा टक्का वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या १२७ पैकी ४४ शाळांना मुख्याध्यापकच नसल्याची बाब समोर आली आहे.
दुसरीकडे महापालिका शाळांबरोबर खाजगी आणि माध्यमिक शाळांची जबाबदारी ज्या गट अधिकाऱ्यांवर असते, त्या अधिकाऱ्यांची संख्या आठवरून चारवर आली आहे. या चारमध्येही केवळ दोनच गट अधिकाऱ्यांवर हा भार येऊन ठेपला आहे. महापालिकेच्या ८७ इमारती असून, त्यामध्ये १२७ शाळा भरतात. यात मराठी माध्यमाच्या ९४, उर्दू १५, हिंदी ९, गुजराती ५ आणि इंग्रजी ५ शाळांचा समावेश आहे. यामध्ये एकूण ३१ हजार ८७१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंग्रजीच्या पाच शाळांमध्ये तर शिक्षकांसह मुख्याध्यापकही नाहीत. यामध्ये मराठी माध्यमाच्या २०, हिंदी ४, उर्दू १५ आणि इंग्रजी माध्यमाच्या ५ शाळांचा समावेश आहे. यासंदर्भात शिक्षक संघटनांकडून वारंवार पत्रव्यवहार झाला असला तरी अद्यापही या शाळा मुख्याध्यापकांविनाच सुरू आहे.