पालिकेची चेना शाळा क्र. १० होणार डिजिटल; पालिकेची पहिली डिजिटल शाळा ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:17 PM2017-09-25T22:17:12+5:302017-09-25T22:17:30+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार असुन त्यातील बहुतांशी आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
- राजू काळे
भार्इंदर, दि. २५ - मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार असुन त्यातील बहुतांशी आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
शहरात पालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळा आहेत. या शाळांतील शैक्षणिक दर्जा खाजगी शाळांच्या तुलनेत सुमार असल्याचा आरोप सर्वच स्तरातुन केला जातो. त्यामुळे पालिकेने खाजगी शाळांतील दर्जेदार शिक्षण गरीब व गरजु विद्यार्थ्यांना मोफत मिळावे, यासाठी खाजगी शाळांना व्यावसायिक ऐवजी ५० टक्के निवासी कर आकारण्यास सुरुवात केली. त्यातुन २५ टक्के जागा त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश काढण्यात आला. परंतु, त्याची ठोस अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी त्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळेखेरीज पर्याय नसल्याने ९ वी नंतरचे शिक्षणही बेभरोसे राहते. कारण पालिकेच्या शाळा ८ वी पर्यंतच असुन ८ वीचे वर्गही काहीच शाळांत सुरु करण्यात आले आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थी पटसंख्या वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांसह गणवेशाचे मोफत वाटप करते. परंतु, शिक्षणाचा दर्जा खाजगीच्या तुलनेत वाढत नसल्याने सध्या डिजिटल होत असलेल्या खाजगी शाळांप्रमाणेच पालिका शाळासुद्धा डिजिटल करण्याचा प्रयत्न एक वर्षापुर्वी सुरु झाला. त्याला नुकतेच यश आल्याने डिजिटल शाळेसाठी सुरुवातीला चेना मराठी शाळेची निवड करण्यात आली आहे. हि शाळा शहराच्या वेशीवर तसेच संजय गांधी राष्टÑीय उद्यानाला लागुन असल्याने या शाळेत बहुतांशी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ ली ते ८ वी पर्यंतचे एकुण ८ वर्ग असलेल्या शाळेत २४१ विद्यार्थी शिक्षण घेत असुन मुख्याध्यापकांसह आठच शिक्षक कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डद्वारे शिक्षण देण्याच्या कार्यवाही अंतर्गत सुरुवातीला एक डिजिटल बोर्ड देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना भौगोलिक, ऐतिहासिक, विज्ञान, सांस्कृतिक सचित्र ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत २१ संगणक बसविण्यात येणार असुन सुसज्य लायब्ररी साकारण्यात येणार आहे. डिजिटल शिक्षण देण्यासाठी सुरुवातीला खाजगी शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार असुन त्याचे प्रशिक्षण शिक्षकांना सुद्धा दिले जाणार आहे. डिजिटल शिक्षणाचा लाभ प्रामुख्याने आदिवासी व इतर गरीब विद्यार्थ्यांना होणार आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रमुख, उपायुक्त दिपक पुजारी : डिजिटल शिक्षण देण्यास चेना मराठी शाळेपासुन सुरुवात होणार असली तरी उर्वरीत पालिका शाळांतही ते लवकरच सुरु केले जाणार आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन केला जात आहे.
चेना शाळेचे मुख्याध्यापक विश्वास हिरे : डिजिटल शिक्षणासाठी चेना मराठी शाळेची निवड झाल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे.