राज्यभरातील शाळा सॅटेलाइटने जाेडणार - दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 01:45 PM2022-11-20T13:45:20+5:302022-11-20T13:46:26+5:30

राज्यातील माझी ई-शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली.

Schools across the state to be connected by satellite says Deepak Kesarkar | राज्यभरातील शाळा सॅटेलाइटने जाेडणार - दीपक केसरकर

राज्यभरातील शाळा सॅटेलाइटने जाेडणार - दीपक केसरकर

Next

भिवंडी : काेराेनाकाळात आदिवासी आणि दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण देताना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला हाेता. सरकारतर्फे राज्यभरातील सर्व शाळा सॅटेलाइटने जाेडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भविष्यात दुर्गम भागातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीतील अडचणी दूर करण्यात येणार आहेत. राज्यभरात डिजिटल शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती शनिवारी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

राज्यातील माझी ई-शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली. शनिवारी भिवंडीतील काल्हेर जिल्हा परिषद शाळेत या अभियानाचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन, जिल्हा परिषद ठाणे व राज्य सरकारच्या समग्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह एल अँड टी, प्रथम फाउंडेशनचे अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

केसरकर म्हणाले की, स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचे असून शाळा सॅटेलाइटने जोडण्यात येणार आहेत. शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे विद्यार्थ्यांच्या मोबाइल ॲपवर संग्रहित होणार आहेत. तशी टेक्नॉलॉजीही लवकरच राज्यात विकसित करण्यात येणार असल्याचेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.

मातृभाषेतून शिक्षणामुळे फायदा
केसरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘मातृभाषेतून शिक्षण’ ही नवीन शिक्षण पद्धती अमलात आणली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेणे शक्य होणार आहे. त्याचा इंजिनिअरिंग व मेडिकलच्या अभ्यासक्रमातही फायदा होणार आहे. तसेच इंग्रजी भाषेचा आपल्यावर असलेला पगडाही हळूहळू कमी होणार आहे. अनेक देशांत स्थानिक मातृभाषेतून शिक्षण घेत असल्याने ते शिक्षणात व आर्थिक सुबत्तेत अग्रेसर आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना व्यासपीठावरच झापले 
शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर आयएएस दर्जाचे अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी चर्चा करीत होते. त्यामुळे केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत हाेता. त्यामुळे त्यांनी भाषण थांबवून अधिकाऱ्यांना तेथेच झापले. ‘मंत्र्यांचे भाषण सुरू असताना आपसांत बोलणे चुकीचे आहे. मी एक वरिष्ठ मंत्री आहे. मी हे खपवून घेणार नाही. यापुढे लक्षात ठेवा,’ अशी कानउघाडणी केसरकर यांनी केली.

Web Title: Schools across the state to be connected by satellite says Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.