शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:13 AM2019-06-18T00:13:24+5:302019-06-18T00:13:39+5:30
विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; रांगोळ्यांचे सडे, तोरणांची सजावट
ठाणे : सुटी संपून सोमवारपासून शाळा सुरू झाल्या. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत पहिल्यांदाच पाऊ ल ठेवले. त्यांचे स्वागत दणक्यात आणि अनोख्या स्वरूपात करण्यात आले. काही शाळांच्या प्रवेशद्वारांवर मिकी माउस, डोरेमॉन, छोट्या भीमसह अनेक कार्टूनही सज्ज झाली होती. काही शाळांमध्ये फुलांसह आंब्यांच्या पानांचे तोरण बांधून सजावट करण्यात आली होती. शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांचे औक्षण तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. तसेच वर्गात विविध खेळणी आणि खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. मात्र, काहींचा आई-बाबांचा हात सोडताना डोळे पाणावले होते. सोमवारी शहर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये असेच वातावरण होते. प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नवा डबा, नवे दप्तर, वह्या-पुस्तके यांची नवलाई होतीच, मात्र सुटीनंतर मित्र-मैत्रिणींना भेटण्याची उत्सुकताही दिसत होती.
पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थी प्रथमच पालकांसोबत शाळेत आले होते. त्यांच्यासाठी येथील वातावरण पूर्णत: अनोळखी असल्याने त्यांच्याकडून आई-वडिलांचा हात सुटत नव्हता. शाळांनी पहिला दिवस साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औंक्षणाने करण्यात आले. खेळीमेळीचे वातावरण राहण्यासाठी मुलांच्या आवडीच्या कार्टून्सना पाचारण करण्यात आले होते.
सुटी असल्याने दोन महिन्यांपासून शांत असलेला शाळांचा परिसर पुन्हा गजबजून गेला होता. कुठे हुंदक्यांचा आवाज, तर कुठे हसण्याचा आवाज येत होता. शाळेच्या प्रवेशद्वारावर काही पालक रडणाºया मुलांना खाऊचे आमिष दाखवताना दिसत होते.