शाळेच्या महिला लिपीकाने केला पाच लाख ९८ हजारांच्या रकमेचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:23 PM2019-03-17T23:23:10+5:302019-03-17T23:27:09+5:30
विद्यार्थ्यांनी दिलेले मासिक शुल्क शाळेत भरणा करण्याऐवजी पाच लाख ९८ हजारांच्या रकमेचा अपहार करणाऱ्या अवनी घाडी या महिला लिपीकाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे: पाचपाखाडी येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील सुमारे ६१ विद्यार्थ्यांचे पाच लाख ९८ हजारांचे शुल्काची रक्कमेचा अपहार करणाऱ्या अवनी घाडी (३२, रा. सागाव, डोंबिवली) या महिला लिपीकाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घाडी या लिपीक महिलेकडे विद्यार्थ्यांचे शुल्क जमा करण्याची जबाबदारी होती. विद्यार्थ्यांचे रोख स्वरुपात पैसे जमा केल्यानंतर पालकांना ती रितसर पावती देखील द्यायची. पण संबंधित पालक किंवा विद्यार्थी निघून गेल्यानंतर संगणकातून त्यांची नोंद काढून टाकायची. कालांतराने ठराविक विद्यार्थ्यांचे शुल्क भरले न गेल्याचे शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आले. तेंव्हा त्यांनी या ६१ विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विचारणा केली. या पालकांनी शालेय शुल्क भरल्याचा दावा करीत शाळेकडूनच देण्यात आलेल्या पावत्याही सादर केल्या. शाळेने चौकशी सुरु केल्यानंतर तिने एका विद्यार्थ्याचे २० शुल्क भरण्यासाठी आपल्याच पतीच्या धनादेशाचा वापर करीत त्यावर त्या विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता आणि तुकडी असा तपशीलही टाकला. एक धनादेश वटला. पण इतर धनादेश वटलेच गेले नाही. शाळेच्या चौकशीत तथ्य आढळल्यानंतर तिला कामावरुन कमी करण्यात आले. शाळेतील रेकॉर्डसाठी असलेली पावती ही शाळेच्या संगणकातील ई- सुविधा या सॉफ्टवेअरमाून रद्द करुन सुमारे पाच लाख ९८ हजारांचे शुल्क हे शाळेच्या बँक खात्यात जमा न करता त्याचा अपहार करुन स्वत:कडेच ठेवल्याचेही शाळेच्या चौकशीत समोर आले. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या काळात हा प्रकार सुरु होता. डिसेंबरमध्ये शाळेने तिच्यावर कारवाई करुन याप्रकरणी तिच्याविरुद्ध शालेय प्रशासनाच्या वतीने १६ मार्च २०१९ रोजी फसवणूक आणि अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.