शाळा, इंटरनेट सेवा केली बंद; शहर, रेल्वे पोलिसांनी ७२ जणांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 09:32 AM2024-08-22T09:32:50+5:302024-08-22T09:33:06+5:30
आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या ४० आंदोलकांना शहर पोलिसांनी अटक केली. आंदोलकांवर एकूण चार गुन्हे दाखल केले.
बदलापूर : येथील नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर शहरात मंगळवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर खबरदारी म्हणून बुधवारी शहरातील सर्व शाळांसह इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या ४० आंदोलकांना शहर पोलिसांनी अटक केली. आंदोलकांवर एकूण चार गुन्हे दाखल केले.
बदलापूर स्थानकात आंदोलकांनी मंगळवारी आठ तास आंदोलन केले. त्यानंतर त्यास हिंसक वळण लागले. त्यामुळे शहर पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी या आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या आंदोलकांची धरपकड सुरू केली. मंगळवारच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी बुधवारी शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
तसेच सोशल मीडियावर अफवा पसरून पुन्हा उद्रेक होऊ नये म्हणून दिवसभर बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. शाळा, रेल्वे स्टेशन आणि परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शहरात तणावपूर्ण शांतता होती.
पोलिस आयुक्तांनी ठोकला तळ
ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे हे बुधवारी बदलापुरात तळ ठोकून होते. मंगळवारच्या घटनेनंतर पोलिसांनी बुधवारी एकाच ठिकाणी जमाव जमणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली. आयुक्त डुंबरे आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी शहरात तळ ठोकून होते. पोलिस ठाण्यात बसून शहरातील वातावरणाचा आढावा त्यांनी घेतला.
आंदोलनात मुलगा बेपत्ता; माउलीने फोडला टाहो
शालिनी घोलप या मंगळवारी गावी गेल्या होत्या. मुलगा रोहित याला अटक झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी रातोरात बदलापूर गाठले. बुधवारी सकाळपासून त्या कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यासमोर उभ्या होत्या. आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवून आधारवाडी कारागृहात नेले जात होते. पण, रोहित न दिसल्याने शालिनी यांनी टाहो फोडला. त्यांचा टाहो ऐकून पोलिस अधिकारी लक्ष्मण चव्हाण यांनी अटक केलेल्या आरोपींची यादी त्यांना वाचून दाखविली. मात्र, त्या यादीतही रोहित याचे नाव नव्हते. रोहितला आता कुठे शोधू, माझा आधार कुठे गेला. त्याचे काय झाले, या विवंचनेत शालिनी या धाय माेकलून पोलिस ठाण्यासमोर रडत होत्या.