लोकल टू ग्लोबल शिक्षण देणारी शाळा; खर्डीतील आंतरराष्ट्रीय शाळेत विद्यार्थी घेताहेत डिजिटल शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 02:04 AM2020-02-03T02:04:01+5:302020-02-03T02:04:43+5:30
शासनाने राज्यातील १३ शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड केली त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील ही एकमेव शाळा होय.
- स्नेहा पावसकर
ठाणे : केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, दप्तराचे ओझे न बाळगता डिजिटलाइज शिक्षण, लोकल टू ग्लोबल शिक्षण, अभ्यासक्रमआधारितच नव्हे तर व्यावहारिक शिक्षण मुलांना दिले जात आहे ते ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपक्रम राबविणारी ही शाळा प्रयोगशील शाळा ठरत आहे.
शासनाने राज्यातील १३ शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड केली त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील ही एकमेव शाळा होय. शाळेचे हे दुसरे वर्ष असून सध्या शाळेत ज्युनिअर केजी ते ४ थी इयत्तेपर्यंतचे वर्ग चालतात. प्रत्येक इयत्तेत ६० विद्यार्थी आहेत. या शाळांसाठी अभ्यासक्रम वेगळा असला तरी थीमबेस लर्निंगवर येथे भर दिला आहे. प्रत्येक इयत्तेनुसार थीम वेगळी आहे परंतु प्रत्येक विषयाचा त्याच्याशी संबंध जोडूनच मुलांना शिकवले जाते. दप्तराच्या ओझ्यातून मुलं मोकळी व्हावीत म्हणून त्यांना पुस्तक नाहीत, तर केवळ वही आणायला सांगितले जाते. ही शाळा डिजिटलाइज असल्याने शाळेत कॉम्प्युटर, एलईडी स्क्रीन, इंटरनेट आदी सर्व सुविधा आहेत.
आपण प्रत्यक्ष जीवन जगत असताना केल्या जाणाऱ्या व्यवहारात्मक कृती विद्यार्थ्यांना योग्य वयात समजाव्या या उद्देशाने चलन व चलनाचा वापर विद्यार्थ्यांना शिकवला गेला, मात्र तोही प्रत्यक्ष कृतीतून. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मिळून खाऊ जत्रेचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी स्टॉलवर विविध खाद्यपदार्थ मांडले होते. मात्र या खाऊ जत्रेमागचा मुख्य उद्देश होता तो विद्यार्थ्यांनी स्वत: चलनाचा वापर करावा. त्यानुसार नफा, तोटा, ग्रॅम, लीटर या प्रमाणित एककांचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहार मुलांनी केला. या व्यवहारात होणाºया नफातोट्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली.
बदलत्या काळानुसार मुलांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे म्हणून आम्ही सर्व शिक्षक कायम प्रयत्नशील असतो. मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात आणि विशेष म्हणजे मुलेही त्यात उत्साहाने सहभागी होतात. परिसरात जाऊन काही गोष्टींची प्रत्यक्ष अनुभवाद्वारे माहिती दिली जाते. स्थानिक ग्रामस्थही सहकार्य करतात.
काही कृती मुलांकडूनच करवून घेतो. - सुधीर भोईर,
मुख्याध्यापकमुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने मुलांना विविध वस्तू तयार करायला प्रोत्साहन दिले जाते. मग ते एखादे खेळणे, चित्र, मूर्ती किंवा बाहुली असो. शाळेतच मुले एकमेकांच्या सहकार्याने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तू बनवतात. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या सुंदर कलाकृती शाळेतच मांडल्या जातात. माझे कलादालन हा उपक्रम त्यासाठी सुरू केला असून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची कलाकृती त्यात मांडली जाते.