ठाण्यातील शाळा, कॉलेज होणार तंबाखूमुक्त
By admin | Published: July 9, 2015 11:59 PM2015-07-09T23:59:07+5:302015-07-09T23:59:07+5:30
सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता राज्य शासनाने पावले उचलली आहेत.
अजित मांडके ठाणे
सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता राज्य शासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्वच शाळा-महाविद्यालये तंबाखूमुक्त करण्याचे शासनाने निश्चित केले असून त्यानुसार शाळेच्या १०० यार्ड क्षेत्रात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने विकण्यास बंदी घातली असून ती मोडणाऱ्यास २०० रुपयांचा दंड आणि शिक्षा केली जाणार आहे.
याही पुढे जाऊन शाळेच्या जिन्यांसह प्रत्येक मजल्यावरील लिफ्टच्या प्रवेशद्वारावर धूम्रपानबंदीबाबतचे सूचना फलक लावण्याच्या नवीन मागदर्शक तत्त्वांची आचारसंहिता संस्थाप्रमुखांना घालून दिली आहे. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनीसुद्धा अशा पदार्थांचे सेवन करू नये, असेही यात स्पष्ट केले आहे.
भारतात रोज २५०० लोक तंबाखूशी संबंधित आजारांमुळे मृत्यू पडतात. गॅट्सच्या (ग्लोबल यूथ तंबाखू सर्व्हे) सर्व्हेनुसार महाराष्ट्रात २.५ कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. तंबाखू आणि त्याच्या दुष्परिणामांना जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. १३ ते १५ वर्षे वयोगटांतील १४ टक्क्यांपेक्षा जास्त मुले याचे सेवन करतात. त्यामुळेच शासनाने याविरोधात चोख पावले उचलत नवीन परिपत्रक जाहीर केले आहे.