ठाणे जिल्ह्यातील शाळा आज गजबजणार, पुष्प देऊन होणार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:35 AM2018-06-15T04:35:47+5:302018-06-15T04:35:47+5:30
ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शुक्रवार, १५ जूनपासून सुरू होत असून पहिली ते आठवीच्या एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थ्यांचे आपापल्या शाळेत पुष्प देऊन स्वागत होणार आहे.
ठाणे - जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शुक्रवार, १५ जूनपासून सुरू होत असून पहिली ते आठवीच्या एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थ्यांचे आपापल्या शाळेत पुष्प देऊन स्वागत होणार आहे. याशिवाय, आयोजित केलेल्या स्वागत समारंभात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते आठ लाख ८४ हजार ३६५ पुस्तकांचे वाटप केले जाणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.
यंदाच्या या शैक्षणिक वर्षापासून पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. तरीदेखील या नवीन अभ्यासक्रमांची पुस्तकेही वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली. नवीन अभ्यासक्रमांनुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ५५ हजार ७८७ पुरस्तकांची मागणी केली आहे. यापैकी ४४ हजार ८५५ पुस्तकांची गाडी आज सायंकाळी पंचायत समित्यांमध्ये पुस्तकांचे वाटप करत आहे. आठवीच्या नवीन अभ्यासक्रमांची पुस्तके आधीच प्राप्त झाली असून एक लाख ६० हजार २८८ पुस्तकांपैकी एक लाख ५८ हजार ४३० पुस्तकांचा जिल्ह्यात पुरवठा झाला.
जिल्हा परिषदेच्या एक हजार ३६१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह माध्यमिक व आश्रमशाळेच्या एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थ्यांना या आठ लाख ८४ हजार ३६१ विद्यार्थ्यांना शासनाकडून क्रमिक पुस्तकांचे मोफत वाटप होणार आहे.
यामध्ये मराठी भाषिक माध्यमासह इंग्रजी, हिंदी, उर्दू, तामिळ आणि तेलुगू भाषिक माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या भाषिक माध्यमांतील भिवंडी तालुक्यातील ३९ हजार ६४२ विद्यार्थ्यांसह अंबरनाथच्या ४२ हजार ५६०, कल्याणच्या २१ हजार ८९३, मुरबाडच्या २२ हजार ५६१ आणि शहापूरच्या ४० हजार ५९५ विद्यार्थ्यांनापहिली ते आठवीच्या वर्गांची पुस्तके मोफत वाटप होणार आहेत.
दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण करून ठेवली होती अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
पहिली व आठवीच्या वर्गांप्रमाणेच दुसरीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना ५५ हजार ७८७ पुस्तके मागणीनुसार मिळाली आहेत. तिसरीच्या वर्गातील ८० हजार ४७३ पुस्तकांच्या मागणीपैकी ८० हजार ३९६ पुस्तके मिळाली. चौथीच्या वर्गाकरिता एक लाख आठ हजार २६६ पुस्तके मिळाली.
पाचवीसाठी एक लाख २७ हजार ८५६, सहावीसाठी एक लाख ५१ हजार ५२८ आणि सातवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना एक लाख ५७ हजार २४७ पुस्तकांचा पुरवठा विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे. पुस्तके कशी असतील याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पसरलेला आहे.