‘नासा’ संस्थेतील शास्त्रज्ञाचा कल्याणमधील विद्यार्थ्यांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 12:16 AM2020-08-09T00:16:04+5:302020-08-09T00:16:23+5:30
स्पेस टेक्नॉलॉजीची दिली माहिती; मुलांनीही विचारले प्रश्न
कल्याण : अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेतील जॉर्ज सालझार या शास्त्रज्ञाने कल्याणच्या केम्ब्रीआ शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सालझार यांनी स्पेस टेक्नॉलॉजी या किचकट विषयावर संवाद साधत त्याचे पैलू अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
शालेय शिक्षणासोबत पुस्तकबाह्य शिक्षण केम्ब्रीआ शाळेत विद्यार्थ्यांना दिले जाते. सालझार यांनी दोन तास वेबिनारद्वारे हा संवाद साधला. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यात एक पुसटशी रेषा आहे. विज्ञानाद्वारे निसर्ग समजून घेण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी सतत प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे मत सालझार यांनी व्यक्त केले.
गणित, विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना यावेळी समजावून सांगण्यात आले. अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी, अभ्यास, ठोकताळे, अमेरिकेची चंद्रावरची ऐतिहासिक अपोलो मोहीम, पूर्वी आणि आताचे अंतराळ तंत्रज्ञान, कम्युनिकेशन सिस्टीम, सूर्यमाला, हबल दुर्बीण यासारख्या विषयांची माहिती त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना दिली. तर, सालझार यांना अंतराळ, ब्लॅक होल्स, टाइम मशीन, मंगळ ग्रह, पृथ्वीवरील आणि अंतराळातील वेळांमध्ये असणारा फरक, रॉकेट तंत्रज्ञान, गुरुत्वाकर्षणाचा शरीरावर होणारा परिणाम यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले.
मुुलांना प्रश्न पडले पाहिजेत, हाच या वेबिनारचा मुख्य उद्देश होता, असे शाळेचे प्रमुख बिपिन पोटे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही असे वेगळे उपक्रम राबवण्यात येतील, असे शाळेतर्फे सांगण्यात आले.