रिपाइं आठवले गटाच्या शहराध्यक्ष पदासाठी पक्ष नेत्यांकडून चाचपणी
By सदानंद नाईक | Published: October 9, 2024 05:42 PM2024-10-09T17:42:52+5:302024-10-09T17:47:04+5:30
Ulhasnagar News: रिपाइं आठवले गटाच्या शहराध्यक्ष पदासाठी वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चाचपणी मंगळवारी केली. यावेळी अनेकांनी शिंदेंसेनेचे शहरसंघटक नाना बागुल यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी घेतल्याने, चाचपणीसाठी आलेले नेते बुचकळ्यात पडले.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - रिपाइं आठवले गटाच्या शहराध्यक्ष पदासाठी वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चाचपणी मंगळवारी केली. यावेळी अनेकांनी शिंदेंसेनेचे शहरसंघटक नाना बागुल यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी घेतल्याने, चाचपणीसाठी आलेले नेते बुचकळ्यात पडले.
रिपाइं आठवले गटाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी उल्हासनगर शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांची गेल्या आठवड्यात पक्षातून हकालपट्टी करून शहर कार्यकारणी बरखास्त केली. विधानसभा निवडणुकी पूर्वी शहरजिल्हाध्यक्ष व कार्यकारणीच्या निवड चाचपणीसाठी पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश बारसिंगे, राम शेवाळे, संजय गायकवाड आदींनी शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कॅम्प नं-३ येथील प्रवीण हॉटेल मध्ये मंगळवारी बैठक बोलाविली होती. शहराध्यक्ष व कार्यकारणी पदासाठी उपस्थितांचे मते एकून घेतली. माजी नगरसेवक शांताराम निकम, नाना पवार, गौतम ढोके, गंगाधर मोहड, रामभाऊ तायडे आदींनी शहराध्यक्ष पदासाठी स्वतःची नावे सुचविली. त्यांच्या नावाला अनेकांनी समर्थन केले. मात्र कोणत्याही एका नावावर एकमत झाले नाही. याचवेळी रिपाइंचे माजी शहरजिल्हाध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक नाना बागुल यांच्या नावाचीही शहराध्यक्ष पदासाठी अनेकांनी शिफारस केली आहे.
रिपाइंचे प्रदेश सचिव सुरेश बारसिंगे यांनीही स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उल्हासनगर शहराध्यक्ष पदासाठी शिंदेंसेनेचे शहर संघटक नाना बागुल यांच्या नावाची अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिफारस केल्याची कबुली दिली. अद्याप शहराध्यक्ष पदासाठी एकमत झाले नसून पक्षप्रमुख केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना याबाबतचा अहवाल देणार असल्याचे मत बारसिंगे म्हणाले. तसेच पुढील आठवड्यात पक्षाचा शहराध्यक्ष व शहर कार्यकारणी घोषित होण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.