कल्याणच्या खाडीत अवतरले परदेशी पाहुणे, सीगल पक्ष्यांना पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:04 AM2018-01-11T10:04:39+5:302018-01-11T10:11:29+5:30
कल्याणच्या खाडीवर सध्या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय.
डोंबिवली- कल्याणच्या खाडीवर सध्या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. हे पाहुणे आहेत सीगल पक्षी. अमेरिका आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले हे पक्षी पाहण्यासाठी कल्याणकर सध्या मोठी गर्दी करतायत.विशेष म्हणजे या पक्ष्यांनी चक्क भारताचा नकाशाच सादर केल्याचे दिसून आले.
अथांग पसरलेली खाडी.. त्यावर मनसोक्त विहार करणारे पांढरे शुभ्र सीगल पक्षी.. हे चित्र एखाद्या पक्षी अभयारण्यातलं नाहीये, तर हे चित्र आहे कल्याणच्या खाडीवरचं! युरोप आणि अमेरिकेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सध्या भारतात आलेत. पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असं मोहक रूप असलेल्या या पक्ष्यांच्या प्रेमात कुणी पडलं नाही, तरच नवल. हे पक्षी पाण्यात विहार करत असताना तर जणू मोत्यांची माळच पाण्यात अंथरल्याचा भास होतो. त्यामुळंच हे पक्षी पाहण्यासाठी, त्यांना आपल्या कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सध्या कल्याणकर खाडीवर मोठी गर्दी करतायत.
या पक्ष्यांचं मुख्य खाणं म्हणजे छोटे मासे आणि खेकडे. पण कल्याणमध्ये मात्र त्यांना शेव, चिवडा आणि चक्क कुरकुरे खाण्याचीही सवय लागली असून कल्याणकरांच्या पाहुणचाराने हे सीगल चांगलेच खवय्ये बनलेत. त्यामुळंच कल्याणकरही त्यांना भेटायला येताना रिकाम्या हाताने कधीच येत नाहीत. आणि नागरिक खाडीच्या पुलावर आल्याचं पाहताच हे पक्षीही अगदी उत्स्फुर्तपणे पुलाच्या काठावर येऊन मनसोक्तपणे फोटोसेशन करवून घेतात. वर्षातून तीनवेळा हे परदेशी पाहुणे कल्याणच्या मुक्कामी येतात. त्यामुळं त्यांना पाहण्यासाठी आपणही एकदातरी नक्कीच जायला हवं.