ठामपाकडून 84 दुकाने सील; ९२ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:50 AM2020-12-18T00:50:31+5:302020-12-18T00:50:42+5:30
मालमत्ताकर, पाणीकर थकीत
ठाणे : प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणीपुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून पहिल्या टप्प्यात दिव्यातील कर न भरणारी ८४ दुकाने व १० निवासी खोल्या सील केल्या असून ९२ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. शिवाय ३७९ थकबाकीधारकांना डिमांड नोटीस बजावली आहे. १४ ते १७ डिसेंबर २०२० या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्यावतीने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ताकर आणि पाणीदेयकांच्या तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे. यासाठी प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्टे दिली आहेत. दिवा प्रभाग समितीमध्ये करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त महेश आहेर यांनी करवसुलीकरिता धडक मोहीम हाती घेऊन थकबाकीदारांवर ही कठोर कारवाई सुरू केली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी केली आहे विक्रमी वसुली
लॉकडाऊनमुळे ठामपाचे उत्नन्नाचे स्त्रोत पूर्णत: ठप्प झाले होते. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतर आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन उत्पन्न वाढीचे आदेश दिले. सुटीच्या दिवशी कार्यालये उघडी ठेवली. तसेच विशेष व्हॅनही तैनात केली. शिवाय पालिकेच्या जाळ्यात नसलेल्या मालमत्ता शोधण्याचेही आदेश दिले होते.
आयुक्तांच्या या आदेशामुळे याचा सकात्मक परिणाम दिसून आला. कोरोना असूनही महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकराचे तब्बल ३६० कोटी तसेच पाणीपट्टीचे ६५ कोटी वसूल झाले. शिवाय नव्या दीड हजार मालमत्तांचा शोध घेेऊन त्यांना नव्याने मालकत्ताकर लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
थकबाकीदारांची यादी तयार
ठामपाने मालमत्ताकर आणि पाणीपट्टी न भरणार्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. यात माेठे, मध्यम आणि कमी थकबाकी असलेले असे वर्गृीकरण करून त्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून प्रसंगी मालमत्ता सील करणे, त्यांचा लिलाव करणे, अशी प्रक्रिया केली जाणार आहे.