भिवंडी पालिकेतील विरोधी पक्षनेत्याचे दालन सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:58+5:302021-03-17T04:41:58+5:30
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत महापौरांनी विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले मतलूब ...
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत महापौरांनी विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले मतलूब सरदार खान यांंची नियुक्ती केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची करण्यात आलेली नियुक्ती बेकायदा असल्याची तक्रार नगरसेवक जावेद दळवी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेऊन शिंदे यांच्या आदेशाने नियुक्त केलेल्या विरोधी पक्षनेतेपदाला आता महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार सोमवारी हे दालन सील केले.
दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे आणखी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक दळवी हे धावपळ करीत असून कोकण आयुक्तांकडे तक्रार केल्यामुळे सुनावणी सुरू झाली आहे. असे असताना कोणार्क विकास आघाडीच्या वतीने भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद काढून ते काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीच्या सरदार यांच्याकडे सुपूर्द केले. महापौरांनी केलेली ही नियुक्ती बेकायदा आहे, अशी तक्रार दळवी यांनी केली होती.