मुंब्य्रातील शाळेची इमारत सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:50 AM2018-10-13T00:50:06+5:302018-10-13T00:51:07+5:30
- कुमार बडदे मुंब्रा : दहावीचे पेपर लीक केल्यामुळे शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर, अतिधोकादायक इमारतींच्या श्रेणीत मोडलेली ...
- कुमार बडदे
मुंब्रा : दहावीचे पेपर लीक केल्यामुळे शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर, अतिधोकादायक इमारतींच्या श्रेणीत मोडलेली मुंब्य्रातील एका खासगी शाळेची इमारत ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांनी गुरूवारी सील केली. त्यामुळे शाळेतील ८० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.
येथील अलमास कॉलनी भागातील सैनिकनगर परिसरातील किडस् पॅराडाइज स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्या इमारतीमध्ये वर्ग भरत होते, ती तळ अधिक दोन मजली इमारत धोकादायक असल्यामुळे तिचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश ठामपाने जुलै २०१८ मध्ये दिले होते. आॅडिटमध्ये ही इमारत अतिधोकादायक असल्याचे उघड झाले. त्यामुळे ती सील करण्यात आली. आठ दिवसांमध्ये ती पाडण्यात येणार आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची इतर शाळेत व्यवस्था करण्याच्यादृष्टीने झालेल्या प्रयत्नांना शाळेच्या मुख्याध्यापिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याची माहिती दिवा प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी सुनील मोरे यांनी लोकमतला दिली.
सात महिन्यांपूर्वी दहावीचे पेपर या शाळेतून लीक झाल्याचे तपासाअंती उघड झाल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या शाळेची दहावी आणि बारावीची मान्यता रद्द केली होती.