‘टेक्नोक्राफ्ट’ला लागणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:53 AM2017-08-04T01:53:31+5:302017-08-04T01:53:31+5:30
मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील धानिवली येथील टी शर्ट बनवणाºया टेक्नोक्राफ्ट कंपनीतील रसायनयुक्त पाणी मुरबाडी नदीपात्रात सोडत असल्याने ही कंपनी सील करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केली आहे.
मुरबाड : मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील धानिवली येथील टी शर्ट बनवणाºया टेक्नोक्राफ्ट कंपनीतील रसायनयुक्त पाणी मुरबाडी नदीपात्रात सोडत असल्याने ही कंपनी सील करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केली आहे. १५ वर्षांपासून सुरू असलेल्या कंपनीला या कारवाईमुळे धक्का बसला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातदेखील याचे पडसाद उमटले. त्यानंतरच तातडीने ही कारवाई झाली.
मुरबाडी नदीच्या पात्रात सोडण्यात येणाºया या रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे परिसरातील नांदेणी, पशेणी या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच तेथील शेतजमिनीवर त्याचा मोठा परिणाम होऊन जमीन आणि त्यावर पिकवला जाणारा भाजीपाला तसेच इतर पिकेदेखील धोक्यात आल्याने सरपंच श्रीकांत धुमाळ यांनी या दूषित पाण्याबाबत वारंवार कंपनी व्यवस्थापनाकडे विनंती अर्ज केले. मात्र, परिस्थितीत काही फरक पडला नाही.
नदीपात्रातील हे पाणी पिण्याच्या पाणवठ्यात झिरपत असल्याने पाणवठ्यातील शेकडो मासे मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी हे दूषित पाणी घेऊन मुरबाड तहसीलदार कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले.
लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत आ. किसन कथोरे, जितेंद्र आव्हाड, राणा रणजित सिंह, पांडुरंग बरोरा आदी विधानसभा सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून पर्यावरण विभागाकडून तसा अहवाल मागितला. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घटनास्थळी पाहणी करून सुमारे दोन हजार कामगार असलेल्या या कंपनीला सील ठोकले. या कारवाईमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.