कळव्यातील सात वर्षीय अपहृत मुलाचा ४८ तासांमध्ये शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:34+5:302021-06-23T04:26:34+5:30
ठाणे : कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ...
ठाणे : कळवा येथून अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा अवघा ४८ तासांमध्ये शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. या मुलाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास कुर्ला भागातून ठाणे पोलिसांनी शोधून त्याच्या आईच्या ताब्यात सुपुर्द केले.
कळवा, जयभीमनगर क्रमांक दोन येथील महात्मा फुलेनगर, एमआयडीसी पाइपलाइनजवळ राहणाऱ्या या सात वर्षीय मुलाचे खेळताना कोणी तरी अपहरण केल्याची तक्रार ३५ वर्षीय महिलेने कळवा पोलीस ठाण्यात २१ जून रोजी दाखल केली. घरासमोर खेळत असताना २० जून २०२१ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तो बेपत्ता झाला होता. याप्रकरणी समांतर तपास करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली या अपहरणाचा युनिट एकने तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड यांनी मुलाच्या अपहरणाची माहिती खबरी आणि पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फोटोसह प्रसारित केली होती. त्याच दरम्यान तो कुर्ला परिसरात असल्याची माहिती काकड यांना एका खबऱ्याकडून व्हॉट्सअॅपवर मिळाली. ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक काकड, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, जमादार आनंदा भिलारे, हवालदार अजय साबळे, पोलीस नाईक दादा पाटील, भगवान हिवरे आणि पोलीस अंमलदार माधुरी जाधव आदींच्या पथकाची निर्मिती करण्यात आली. कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस ठाण्यात तो होता. या पथकाने नेहरूनगर पोलीस ठाण्यात जाऊन मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ताब्यात घेऊन आईच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकणी यांनी दिली.
* मुलाकडून मिळाली वेगवेगळी माहिती-
अपहरणानंतर थेट कुर्ला भागात तो कसा पोहोचला, याबाबत या मुलाने वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. सुरुवातीला त्याच्याच आईच्या एका मित्राचे त्याने नाव घेतले; परंतु यातील कोणत्याच बाबी सिद्ध न झाल्याने पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिले. अपहरणकर्त्याबाबत अजूनही तपास सुरू असून सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणातील आरोपी अजूनही स्पष्ट झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.