नेपाळ विमान अपघातात बेपत्ता झालेल्या चौघांचा अजूनही शोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:00 AM2022-05-31T07:00:00+5:302022-05-31T07:00:05+5:30
नेपाळच्या पोखरा येथून अन्य ठिकाणी जाण्यासाठी ते विमान प्रवास करीत होते.
ठाणे : नेपाळहून निघालेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानात ठाण्यातील अशोक त्रिपाठी (५४) यांच्यासह चौघांचा समावेश होता. त्यांचे शोधकार्य सुरू आहे. तारा एअरलाइन्सचे नऊ एनईटी ट्विन इंजीन विमान रविवारी सकाळी डोंगराळ भागातील मस्तंग जिल्ह्यात बेपत्ता झाले. या विमानाचे अवशेष कोवांग गावात सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या विमानात २२ प्रवासी होते. त्यापैकी चौघे जण भारतीय असून ते सर्व ठाण्याचे रहिवासी आहेत. ठाण्यातील माजिवडा परिसरातील रुस्तमजी अथेना या इमारतीत ते राहायला होते. या विमानात १३ नेपाळी, २ जर्मन, ४ भारतीय नागरिकांसह तीन कर्मचारी होते. ठाण्यातील रहिवाशांमध्ये अशोक त्रिपाठी (५४), वैभवी बांदेकर-त्रिपाठी (५१), मुलगा धान्यस्य त्रिपाठी (२२) आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी (१८) या चौघांचा समावेश होता. ते सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. ते पर्यटनासाठी नेपाळला गेले होते.
नेपाळच्या पोखरा येथून अन्य ठिकाणी जाण्यासाठी ते विमान प्रवास करीत होते. त्यांचे विमानच बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जॉमसमला जाण्यासाठी विमानाने सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण केले. मस्तंगमधील लेटे परिसरात पोहोचल्यानंतर विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. बेपत्ता त्रिपाठी कुटुंबीयांपैकी कोणाचाही शोध लागलेला नसून त्यांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू असल्याची माहिती ठाण्याच्या कापूरबावडी पोलिसांनी साेमवारी दिली.