समुद्र, खाडीने व्यापलेल्या दांडी गावात बिबट्याचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:48 PM2019-01-29T22:48:11+5:302019-01-29T22:49:07+5:30
गेल्या वर्षाचा सर्व्हे होता सूचक; काही दिवसांपासून कोंबड्यांना केले लक्ष्य
पालघर : तालुक्यातील किनारपट्टीवरील दांडी या गावातील एका बंद घरात लपून बसलेल्या नर जातीच्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असले तरी अन्य बिबट्यांचा परिसरात अधिवास आहे का? याचा शोध घेण्यासाठी वनविभागाची टीम २-३ दिवस दांडी व परिसरात शोध घेणार आहेत.
सोमवारी संध्याकाळी ७.०० च्या सुमारास दांडी गावातील विजय तामोरे यांच्या बंद असलेल्या घरात बिबट्या शिरल्याची माहिती बोईसर वनविभागाला कळल्या नंतर उपवन संरक्षक मोरे यांनी आपल्या टीम सह दांडी गाव गाठीत आपल्या जवळील दोन पिंजाऱ्याच्या साहाय्याने मोठ्या शिताफीने या नर बिबट्या ला पिंजºयात पकडण्यात यश मिळविले. हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमलेले असताना जराशी चूक एखाद्याच्या जीवावर बेतू शकत होती. बघ्यांची गर्दी दूर होत नसताना स्थानिक तरुण, सागरी पोलीस यांच्या सहकार्याने वनविभागाने आपले काम उत्तमरीत्या निभावले.
मागील काही दिवसांपासून गावातील लोकांच्या कोंबड्या, बदके, कुत्रे व मांजर यांच्या मृत्यूच्या घटना घडत असताना सोमवारी रात्री कुत्र्यांचे भुंकणे स्थानिकांचे लक्ष वेधीत होते. परंतु बिबट्याच्या आगमनाची पूर्व कल्पना ते मुके कुत्रे देत असल्याची पुसटशी कल्पनाही ग्रामस्थांना आली नव्हती. परंतु काही ग्रामस्थांनी त्याला तामोरे यांच्या स्नानगृहात दडून बसल्याचे पाहिल्यानंतर न घाबरता दरवाजा बंद करून त्याला पकडण्यात वनविभागाचे काम सोपे केले.
तारापूर अणुशक्ती प्रकल्प टप्पा ३ व ४ साठी मौजे पोफरण व अक्करपट्यी गावाच्या पुनर्वसनात सुमारे ४०० एकर जागा या दोन गावाकडून घेण्यात आली. त्याठिकाणी कुठलेही काम करण्यात आले नसल्याने त्या ठिकाणी झाडे-झुडपे वाढली आहेत.
या भागात गेल्या वर्षी वनविभागाच्या सर्व्हेमध्ये बिबट्या असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले होते. त्यामुळे अजूनही बिबटे असावेत अशी शंका वजा भीती ग्रामस्थ व्यक्त करीत असल्याने उपवनसंरक्षक मोरे यांनी आपल्या टीम तैनात केल्या आहेत.
पकडलेल्या बिबट्याची तपासणी करुन सुटका
मागच्या वर्षी दिसलेल्या बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज मोरे यांनी मागवले असून पकडण्यात आलेल्या बिबट्यांशी आणि फुटेज मधील बिबट्यांशी साधर्म्य तपासले जाणार असल्याची माहिती मोरे यांनी लोकमतला दिली. सोमवारी पकडण्यात आलेल्या बिबट्याची तपासणी करून त्याला पुन्हा जंगलात सोडून दिल्याची माहिती मोरे यांनी लोकमतला दिली.