ठाण्याच्या खाडीत वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 09:00 PM2018-05-27T21:00:07+5:302018-05-27T21:00:07+5:30
‘हिरानंदानी इस्टेट’ येथील खाडीमध्ये २० मे रोजी बुडालेल्या हर्षद भोई या मुलाचा आठव्या दिवशीही पोलिसांकडून शोध सुरुच होता. शनिवार आणि रविवारी खासगी बोटींच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी हा तपास केला.
ठाणे : घोडबंदर रोडवरील खाडीत आठवड्यापूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या वाघबीळ येथील पितापुत्रांपैकी हर्षद भोई (७) या मुलाचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्याचा कासारवडवली पोलिसांनी खासगी बोटींच्या साहाय्याने शनिवारी आणि रविवारी आठव्या दिवशीही शोध घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घोडबंदर रोडवरील ‘हिरानंदानी इस्टेट’ येथील खाडीमध्ये २० मे रोजी ब्रह्मांडमधील धर्माचापाडा येथील राजेश भोई आणि त्यांचा मुलगा हर्षद हे पितापुत्र बुडाले होते. बरीच शोधाशोध केल्यानंतर दोघांपैकी वडिलांचा मृतदेह हाती लागला. आठवडा उलटूनही मुलाचा शोध मात्र लागलेला नाही. राजेश भोई हे मुलगा हर्षद तसेच काही साथीदारांसमवेत रविवारी हिरानंदानी इस्टेट येथील खाडीमध्ये मासेमारीसाठी गेले. खाडीला जिथे नाल्याचे पाणी मिळते, तिथे भोई मुलामुळे थांबले. पण, नंतर ते तिथल्या चिखलात रुतले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पती आणि मुलगा न परतल्यामुळे भोई यांच्या पत्नीने कासारवडवली पोलिसांच्या मदतीने त्या भागात शोधाशोध केली. तेव्हापासून ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही शोध मोहीम राबवण्यात आली. सोमवारी २१ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास राजेश यांचा मृतदेह मिळाला. मात्र, हर्षदचा शोध लागला नाही.
दरम्यान, २६ मे रोजीही कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी, पोलीस नाईक सचिन खटे, कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी वाघबीळ येथील चंद्रकांत पाटील यांची खासगी बोट घेऊन दोन खलाशांच्या मदतीने वाघबीळ ते कोलशेत, कोलशेत ते गायमुख आणि गायमुख ते वाघबीळ या मार्गावरून शोध घेतला. रविवारी मासेमारी करणाऱ्या २० ते २५ जणांकडे पोलिसांच्या चमूने चौकशी केली. कोणीही मासेमारीसाठी खाडीत गेल्यास त्यांना हर्षदबाबतची कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.