रासायनिक प्रदूषण करणाऱ्या केमिकल कंपनीवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:45+5:302021-05-24T04:38:45+5:30

अंबरनाथ : आनंदनगर एमआयडीसीतील डीजी केमिकल कंपनीचे सांडपाणी शेजारी असलेल्या डोंगरावर फवारणी करून त्याची नियमबाह्य पद्धतीने विल्हेवाट लावत ...

A second case has been registered against a chemical company for polluting chemicals | रासायनिक प्रदूषण करणाऱ्या केमिकल कंपनीवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

रासायनिक प्रदूषण करणाऱ्या केमिकल कंपनीवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

Next

अंबरनाथ : आनंदनगर एमआयडीसीतील डीजी केमिकल कंपनीचे सांडपाणी शेजारी असलेल्या डोंगरावर फवारणी करून त्याची नियमबाह्य पद्धतीने विल्हेवाट लावत होते. याप्रकरणी लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाने याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ, आनंदनगर एमआयडीसीमध्ये चिखलोली धरणाच्या उगमस्थानातील डोंगरावर असलेली डीजी केमिकल कंपनी उघडपणे रासायनिक सांडपाणी उघड्यावर टाकून प्रदूषण करीत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या कंपनीने सांडपाण्यावर प्रक्रिया करून नियमाप्रमाणे योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे होते. मात्र, कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रासायनिक सांडपाणी थेट शेजारी असलेल्या डोंगरावर फवारणी करून ते सांडपाणी डोंगरांमध्ये मुरवण्याचा प्रयत्न केला. रासायनिक पाण्याची फवारणी डोंगरावर करून या ठिकाणी असलेल्या वनसंपदेलादेखील धोका निर्माण केला. कंपनीच्या या कृत्यामुळे डोंगरावरील अनेक वृक्ष करपले आहेत. या प्रकरणाची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळाची पाहणी करीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आनंदनगर एमआयडीसी परिसरात अनेक कंपन्या सांडपाणी परस्पर नाल्यात सोडण्याचे प्रकार करतात. मात्र, प्रथमच डीजी केमिकल कंपनीने थेट सांडपाणी डोंगरावर फवारणी करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा नवा उपद्रव सुरू केला होता. या घटनेची माहिती स्थानिकांनादेखील मिळाली होती. त्यांनी याप्रकरणी तक्रारीदेखील केल्या होत्या. मात्र, स्थानिकांच्या तक्रारींना जुमानण्यात आले नाही. या प्रकरणाची तक्रार स्थानिक रहिवाशांनी लोकमतकडे केली. लोकमतने हा प्रकार प्रसिद्ध करताच प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली. डीजी केमिकल कंपनीविरुद्ध २०१७ मध्येदेखील प्रदूषण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

-------------------

Web Title: A second case has been registered against a chemical company for polluting chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.