यादवविरुद्ध खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल
By admin | Published: April 1, 2017 11:32 PM2017-04-01T23:32:03+5:302017-04-01T23:32:03+5:30
वसईतील एका बिल्डरकडून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या डॉ. अनिल यादव यांच्याविरोधात बंदुकीचा धाक
वसई : वसईतील एका बिल्डरकडून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या डॉ. अनिल यादव यांच्याविरोधात बंदुकीचा धाक दाखवून ३३ लाख रुपये खंडणी उकळल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात नालासोपाऱ्यातील एका बिल्डरने केली आहे. त्यानंतर पोलिसांनी यादवसह त्याच्या दोन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी असताना एका डॉक्टरकडून लाच मागितल्याप्रकरणी डॉ. यादवला नोव्हेंबर २०१० ला लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर निलंबित झालेल्या डॉ. यादवने आपल्या भावाच्या नावाने एक नियतकालिक काढून आणि आरटीआयच्या माध्यमातून बेकायदा बांधकामांविरोधात तक्रारी सुुरु केल्या होत्या. इतकेच नाही तर काही बिल्डरांविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल केल्या आहेत. डॉ. यादव यांच्या तक्रारीवरून वसईतील अनेक बिल्डरांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जेलची हवाही खावी लागलेली आहे. मात्र, तक्रारीच्या आडून बिल्डरांना ब्लॅकमेल केले जात असल्याची चर्चाही वसईत सुरु होती. वसई पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या चर्चेला आता उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम पाडण्याचा इशारा देऊन डॉ. यादवने एका बिल्डरला बंदुकीच्या धाकाने धमकावून २५ लाखांची खंडणी मागितली होती.
याप्रकरणी गेल्या आठवड्यात वसई पोलीस ठाण्यात यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादवने आपला सहकारी अमोल पाटील याच्या मदतीने बिल्डरकडून अडीच लाख रुपये उकळले होते. त्यानंतर दीड लाख रुपयांचा हप्ता घेताना पाटीलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचूबंदर येथे रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर डॉ. यादव फरार झाला आहे.
डॉ. यादवने कुणाची फसवणूक केली असेल किंवा धमकावत असेल तर तक्रार नोंदवण्याचे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले होते. या आवाहनानंतर नालासोपाऱ्यातील बिल्डर वंदेश पुरव यांनी यादवने ३३ लाख रुपयांची खंडणी घेतल्याची पहिली तक्रार नोंदवली. नालासोपाऱ्यातील हनुमान नगरातील आपल्या बेकायदा इमारतीबाबत डॉ. यादवने शस्त्राचा धाक दाखवून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.