ई-तिकिटाचा दुसरा प्रयोगही फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:49 AM2018-03-29T00:49:45+5:302018-03-29T00:49:45+5:30
बासनात गुंडाळून ठेवलेला ई-तिकिटाचा प्रयोग आठ वर्षांनंतर ठाणे परिवहनसेवेने प्रायोगिक तत्त्वावर ठाणे ते बोरिवली या एसी मार्गावर सुरू केला असला
ठाणे : बासनात गुंडाळून ठेवलेला ई-तिकिटाचा प्रयोग आठ वर्षांनंतर ठाणे परिवहनसेवेने प्रायोगिक तत्त्वावर ठाणे ते बोरिवली या एसी मार्गावर सुरू केला असला, तरी यामध्ये अनेक त्रुटी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तिकीट प्रिंटिंग न होणे, ते मशीनमध्ये अडकणे, चुकीचे तिकीट प्रिंट होणे अशा अनेक तक्रारी या यंत्रणेत निर्माण झाल्याने संबंधित एजन्सीवर तत्काळ कारवाईचे आदेश सभापतींनी बुधवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत दिले.
ठाणे परिवहनसेवेने २०११ मध्ये ई-तिकीट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, यासाठी तीन वेळा निविदासुद्धा काढण्यात आल्या. परंतु, त्यांना प्रतिसादच मिळाला नाही. असे असताना महापालिकेने याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला. परंतु, त्यात त्रुटी आढळल्याने परिवहनने हा प्रस्ताव अखेर बासनात गुंडाळला होता. त्यानंतर, मागील काही महिन्यांपूर्वी पुन्हा तो प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, ही सेवा अमलात करताना त्यातील त्रुटी दूर करूनच सुरू करावी, अशी अटही परिवहन समितीने टाकली होती. असे असतानादेखील परिवहनने मागील महिनाभरापासून ई-तिकिटाचा प्रायोगिक वापर ठाणे ते बोरिवली या एसी बसच्या मार्गावर केला आहे. परंतु, या तिकीट प्रणालीत अनेक दोष असल्याचे पत्र परिवहनच्या कामगारांनी १५ दिवसांपूर्वीच प्रशासनाला दिले होते. त्यानंतर, अद्यापही कारवाई का झाली नाही, असा सवाल सदस्य राजेंद्र महाडिक यांनी केला. तिकिटावर प्रिंटिंग न होणे, तिकीट मशीनमध्ये अडकणे, चुकीचे तिकीट छापले जाणे यामुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात शाब्दिक वाददेखील होत असल्याचा मुद्दा प्रकाश पायरे, सचिन शिंदे, राजेश मोरे यांनी मांडला. कामगारांनी पत्र देऊनही संबंधित एजन्सीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रकाश पायरे यांनी केला. त्यामुळे या तिकीट यंत्रणेतील सर्व प्रकारच्या त्रुटी दूर करूनच ती सुरू करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. अखेर, मावळते सभापती अनिल भोर यांनीदेखील संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
ठाणे : मागील कित्येक महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या खाजगी बसविरोधातील पाढा बुधवारी झालेल्या परिवहनच्या बैठकीतदेखील सदस्यांनी मांडला. परंतु, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून काही बस जप्तदेखील केल्या आहेत. मात्र, त्या ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचा मुद्दा प्रशासनाने विशद केला. त्यामुळे ठाणे महापालिकेने त्यांच्याकडील एखादा आरक्षित भूखंड त्या ठेवण्यासाठी द्यावा, असा ठरावच यावेळी समितीने संमत केला. ठाणे महापालिका हद्दीत आजही खाजगी बस बेछूटपणे सुसाट धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून परिवहन समिती सदस्य प्रशासनाकडे मागणी करत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी सदस्याने या बसवर कारवाई झाली नाही, तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही त्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बुधवारी परिवहन समितीची बैठक सुरू होताच, सदस्य सचिन शिंदे यांनी या मुद्याला हात घालून आतापर्यंत किती बसेसवर कारवाई केली, त्या केव्हा बंद होणार, असा मुद्दा उपस्थित केला. इतर सदस्यांनीदेखील तो लावून धरला. दरम्यान, प्रशासनाने या बसवर कारवाईसाठी महत्त्वाच्या स्थानकांवर पुरेसे मनुष्यबळ ठेवल्याचे सांगितले. वारंवार कारवाईदेखील सुरू असून दोन बस जप्त केल्याचे सांगितले. परंतु, त्या ठेवण्यासाठीच जागा नसल्याने कारवाई करूनही काही उपयोग होत नसल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी एखादा भूखंड मिळाल्यास त्या ठिकाणी या कारवाई केलेल्या बस ठेवता येऊ शकतात, अशी सूचनाही यावेळी प्रशासनाने केली. त्या अनुषंगाने सदस्य सचिन शिंदे यांनी महापालिकेने आपल्या एखाद्या आरक्षणातील एखादा भूखंड यासाठी द्यावा, अशा आशयाचा ठराव मांडला. त्याला राजेंद्र महाडिक आणि राजेश मोरे यांनी अनुमोदन दिले.