उल्हासनगरमध्ये आढळले कुपोषित बालक, महिनाभरातील दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:37 AM2017-10-07T01:37:54+5:302017-10-07T01:38:05+5:30
शहरातील आझादनगर येथे १० महिन्यांचे कुपोषित बालक आढळले. मागील महिन्यात असेच अतिकुपोषित बालक आढळल्याने खळबळ उडाली होती.
उल्हासनगर : शहरातील आझादनगर येथे १० महिन्यांचे कुपोषित बालक आढळले. मागील महिन्यात असेच अतिकुपोषित बालक आढळल्याने खळबळ उडाली होती. मुलावर मध्यवर्ती रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अतिकुपोषित बालक उपचारासाठी दाखल झाले, अशी माहिती
रु ग्णालयाचे प्रमुख चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांना मिळाली. त्यांनी स्वत: मुलाची तपासणी करून योग्य उपचारासाठी ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. कॅम्प नं.-३ येथील हनुमान मंदिराशेजारी आझादनगर येथे राहणारे नसिरुद्दीन सिद्दीकी यांच्या शाहजाद नावाच्या मुलाचे वजन जन्मापासून कमी आहे. काही महिन्यांपासून त्याची तब्येत खालावली. अखेर, आईवडिलांनी उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. या वेळी तपासणीत बालकाचे वजन ३ किलो असल्याचे समोर आले. जन्मानंतर बालकाचे वजन तिप्पट होणे अपेक्षित आहे. मात्र, शाहजादचे वजन वाढलेच नाही. त्यामुळे कुपोषित गटातच मोडत असल्याची माहिती डॉ. नांदापूरकर यांनी दिली. सध्या हे बालक आजारी असून त्याला कोणत्या व्याधींनी ग्रासले आहे, याची पाहणी बालरोगतज्ज्ञांकडून केली जात आहे. शहरात महिनाभराच्या आत दुसरे कुपोषित बालक आढळल्याने अंगणवाडी सेविकांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.