दुसऱ्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या सुखी संसारात घातला ‘बिब्बा’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:51+5:302021-06-09T04:49:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लॉकडाऊनमुळे मर्यादित संख्येत झालेली लग्ने. सुखी संसाराला सुरुवात करतानाच आर्थिक ताणाताणी. त्यातून लागलेली व्यसनाधीनता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लॉकडाऊनमुळे मर्यादित संख्येत झालेली लग्ने. सुखी संसाराला सुरुवात करतानाच आर्थिक ताणाताणी. त्यातून लागलेली व्यसनाधीनता. त्याचबरोबर सासू-सासऱ्यांबरोबर होणारे वाद. सोशल मीडियाचा अतिवापर अशा अनेक कारणांमुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये गेल्या १५ महिन्यांमध्ये ६१४ तक्रारी आल्या. त्यातील ३३ संसार तडजोडीअंति नव्याने फुलविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही, तोच दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणि निर्बंध लावावे लागले. त्यातून अनेकांची दुकाने अनेक महिने बंद राहिली. काहींच्या नोकऱ्या गेल्या. याच काळात ताण कमी करण्याच्या नावाखाली काही पुरुष व्यसनाधीन झाले. काहींनी सोशल मीडियामध्ये आपले मन रमविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आर्थिक अडचणींमधून उद्भवलेल्या भांडणाचा कडेलोट झाल्यामुळे घरातच पतीकडून होणारी मारहाण, सासू-सासऱ्यांशी होणारे वाद. त्यातही किरकोेळ कारणावरून सासरच्या लोकांपासून होणारा मानसिक, शारीरिक छळ, लॉकडाऊनच्या कारणाखाली माहेरून पैसे आणण्यास भाग पाडणे, एकमेकांच्या चारित्र्यावर संशयाचे भूत असणे किंवा अगदी व्हॉट्सअॅप आणि स्टेट्सला पती, पत्नीने आपले फोटो न लावणे, त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या महिलेकडून पगाराची मागणी करीत तिचा छळ करणे आदी अनेक कारणे या दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात पती, पत्नीच्या संसारात बिब्बा घालण्यात कारणीभूत ठरल्याचे भरोसा सेलचे अधिकारी सांगतात.
...............................
* काय सांगते आकडेवारी मार्च २०२० ते ७ जून (२०२१)
* ६१४ तक्रारी दाखल
१८५ तक्रारींची निर्गती
४२९ तक्रारी प्रलंबित
..........................
जानेवारी ते नोव्हेंबर (२०२०)
४१८ तक्रारी दाखल
....................................
* पोलिसांनी फुलविले ३३ जोडप्यांचे नव्याने संसार
संसारामध्ये भांड्याला भांडे लागून छोट्यामोठ्या गोष्टींवरून कुरबुरी होतात. गेल्या वर्षभरात भरोसा सेलकडे ६१४ तक्रारी आल्या. त्यातील ५२ तक्रारी या पोलीस ठाण्यात गेल्या. ३० जोडप्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग पत्करला. ३३ दाम्पत्यांचे संसार नव्याने फुलविण्यात ठाणे पोलिसांना यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
.................................
* केवळ लादी पुसण्यावरून सासूने सोडले माहेरी
एका प्रकरणात केवळ लादी पुसण्याच्या कारणावरून सासूने विवाहितेला तिच्या माहेरी सोडले. मुलाचे दुसरे लग्न करते, अशीही दमबाजी केली. तेव्हा या विवाहितेने माहेरूनच ठाण्याच्या भरोसा कक्षाकडे दाद मागितली. या प्रकरणात पती, पत्नी आणि सासू यांची भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्तीमार्फत समजूत घातली. त्यानंतर सुनेत विश्वास निर्माण करण्यात यश आल्यानंतर तिने पुन्हा पतीसोबत नांदण्यास जाण्याचा निर्णय घेतला.
* पतीचे होते विवाहबाह्य संबंध-
एका प्रकरणात लग्नाच्या वर्षभरानंतर पती क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ करीत होता. घरात तो जबाबदारीही घेत नव्हता. त्यातच त्याचे विवाहबाह्य संबंधही तिच्या लक्षात आले. या प्रकरणातही तिने भरोसा सेलकडे दाद मागितली. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मात्र त्याने मारहाण किंवा कोणताही त्रास देणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर तिने पतीसोबत नांदण्याची तयारी दर्शविली.
............................
* मोबाइल आणि सासू हेच मोठे कारण....
ठाण्याच्या भरोसा सेलमध्ये अनेक कारणांमुळे महिला तक्रारी घेऊन येतात. परंतु, मोबाइलमध्ये पतीचे असलेले जास्त लक्ष, सोशल मीडियातून दुसऱ्याच महिलेशी होणारी चॅटिंग आणि पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणाऱ्या संशयातूनही वाद होतात. तसेच अनेक घरांमध्ये सासूकडून मारले जाणारे टोमणे आणि क्षुल्लक कारणामुळे होणारा छळ ही सर्वाधिक कारणे या भांडणातून पुढे येतात.
....................
* समुपदेशनातून समझोता
तक्रारदार विवाहिता आणि तिच्या पतीशी कशाप्रकारे वाद आहेत. मूळ समस्या काय आहे, हे आधी जाणून घेतले जाते. त्यानंतर दोघांना पाचारण करून त्यांची समजूत घातली जाते. जर सासू, सासरे किंवा अन्य कारण असेल तर त्यांनाही पाचारण केले जाते. पतीची चूक असेल तर त्यालाही सौम्य भाषेत समजावून सांगितले जाते. गंभीर प्रकरण असेल तर गुन्हे दाखल होतात किवा घटस्फोट होतात. बऱ्याच प्रकरणांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
जयमाला वसावे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल प्रमुख, ठाणे
.............................