दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन ठाण्यात रंगणार, ११ आणि १२ जानेवारी रोजी डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:16 PM2021-12-06T15:16:09+5:302021-12-06T15:16:44+5:30
‘राष्ट्रीय युवा दिवसाचे’ औचित्य साधत, येत्या ११ आणि १२ जानेवारी २०२२ (मंगळवार-बुधवार) रोजी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) ‘युवाशक्ती’ समितीतर्फे ठाण्यात राज्यस्तरीय ‘युवा साहित्य सम्मेलन’ आयोजित करण्यात येत आहे.
ठाणे - ‘राष्ट्रीय युवा दिवसाचे’ औचित्य साधत, येत्या ११ आणि १२ जानेवारी २०२२ (मंगळवार-बुधवार) रोजी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) ‘युवाशक्ती’ समितीतर्फे ठाण्यात राज्यस्तरीय ‘युवा साहित्य सम्मेलन’ आयोजित करण्यात येत आहे. सदर सम्मेलन ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सम्पन्न होत आहे.
प्रसिद्ध युवा साहित्यिक प्रणव सखदेव ह्यांनी सदर सम्मेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषवतील. तसेच उद्घाटक म्हणून आदित्य ठाकरे [ पर्यटन पर्यावरण मंत्री , महाराष्ट्र राज्य ] , एकनाथ शिंदे [ नगरविकास मंत्री , महाराष्ट्र राज्य , पालक मंत्री ठाणे ] , उदय सामंत [ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री , महाराष्ट्र राज्य ] , जितेंद्र आव्हाड [ गृहनिर्माण मंत्री , महाराष्ट्र राज्य ] आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. कोमसाप कार्याध्यक्षा नमिता कीर आणि डॉ प्रा प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सम्मेलन सम्पन्न होणार आहे.
आजच्या तरुणांची आपल्या मातृभाषेशी, विविध साहित्यप्रकारांशी, कलेशी आणि त्यांच्या भवतालाशी कश्याप्रकारे नाळ जुळलेली आहे. या सर्वांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो . पण त्यांच्यासाठी काही ठोस व्यासपीठ देणे आवश्यक असते . त्याकरता हे युवसाहित्य संमलेन आयोजित करण्यात आले आहे . तरुणांच्या सृजनाला, ऊर्जेला आणि अभिव्यक्तीला एक मंच मिळवून देणं आणि देशाच्या व समाजाच्या भावी पिढीला समजून घेण्याकरता एक अवकाश निर्माण करणं हे ह्या सम्मेलनाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
या युवा साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवींचे काव्य संमेलन, बहुभाषिक काव्यसंमेलन, महाविद्यालयीन काव्यकट्टा, गज़लकट्टा, महाराष्ट्रातल्या बोलीभाषा काव्यसंमेलन, नृत्याद्वारे काव्यप्रस्तुती अशी काव्यमेजवानी रसिकांना अनुभवायला मिळेल..आजच्या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या वेब-सीरीज़, चित्रपट कथा लेखन , मालिका लेखन , मिम्स , युट्युब मालिका यामधून मराठी भाषेचा प्रसार होत आहे . या माध्यमातून काम करताना आर्थिक गणितेही आपल्याला बांधता येतात हा विचार मात्र समाज माणसात रुजलेला नाही .याबाबतची चर्चा व्हावी याकरता मायमराठी - एंटरटेनमेंट ते इन्फोटेक या विषयावर परिसंवाद आयोजित केला गेला आहे यामध्ये नाट्य , दूरदर्शन , चित्रपट , जाहिरात या क्षेत्रातील तज्ञ मंडळी भाष्य करणार आहेत . या खेरीज मराठी स्टॅण्ड-अप कॉमेडी, मराठी रॅप, इत्यादी साहित्याला पुरक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी देखील करण्यात आली आहे. ट्रान्सजेण्डर व अन्य उपेक्षित समुदायांच्या अडचणी , उपेक्षा , त्यांचे अधिकार याबाबत चर्चा करण्याकरता श्रीगौरी सावत यांची मुलाखत घेतली जाणार आहे . राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी ,आव्हाने हा देखील सध्याच्या काळातील महत्त्वाचा विषय या विषयावर देखील महाचर्चा आयोजित केली आहे . तसंच, पुस्तक प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, राङ्गोळी प्रदर्शन, इत्यादींचाही सम्मेलनात समावेश असेल.ग्रन्थलेखनापसून प्रकाशनापर्यन्तचा कलात्मक आणि व्यवसायिक प्रवास, जाहिरात, पाठवस्तुलेखन, इत्यादी क्षेत्रांतील मराठी साहित्य व्यवहार, इत्यादी व्यावसायिक विषयांवर तज्ज्ञांशी गप्पा मारण्याची आणि त्यांचे अनुभव ऐकण्याचीही सन्धी श्रोत्यांना आम्ही साहित्य पालखीचे भोई या परिसंवादातून मिळेल. तसेच पत्रकारांचे साहित्यात प्रचंड मोठे योगदान आहे हे नाकारता येत नाही . त्यामुळे पत्रकारिता आणि साहित्य या विषयाशी संबंधित एक चर्चासत्र देखील आयोजित करण्यात येत आहे.
या संमेलनाचा समारोप प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘शिवबा’ ह्या नाटकाच्या प्रयोगाने होणार आहे. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी विश्वासाने डॉ प्रदीप ढवळ यांनी शिवबा या नाटकाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी बळ , आशीर्वाद दिले होते. या प्रयोगाने बाबासाहेब पुरंदरे यांना युवकांतर्फे , कोमसाप तर्फे आणि ठाणेवासियांतर्फे ही एक आदरांजली ठरेल . महाविद्यालयीन विद्यार्थी, पदवीधर युवक, नवीन, अनुभवी, नवोदित व ज्येष्ठ साहित्यिक इत्यादींचा ह्या सम्मेलनात सक्रिय सहभाग असणार आहे. तसेच ठाण्यातील व राज्यातील इतर ठिकाणचेही साहित्यरसिक ह्या सम्मेलनात सहभागी होतील व सम्मेलन यशस्वी करतील असा विश्वास कोमसापच्या युवाशक्तीप्रमुख प्रा. दीपा ठाणेकर यांना वाटतो. ठाणे कोमसाप शाखा हे या संमलेनासाठी पुढाकार घेत आहे . तसेच ज्ञानसाधना , आनंद विश्व गुरुकुल, माजिवडा महाविद्यालय , जोशी बेडेकर महाविद्यालय , बांदोडकर महाविद्यालय , आर जे ठाकूर महाविद्यालय , एन. के. टी , सरस्वती ज्यू. महाविद्यालय , वसंत विहार, एम.एच. हायस्कूल इत्यादी महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग या संमेलनाच्या आयोजनात असणार आहे . या खेरीज काही शाळा देखील आवर्जून साहित्यदिंडी आणि इतर कार्यक्रमात सहभागी होत आहेत .