जिल्ह्यात दुसरी लाट ओसरतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:25+5:302021-07-25T04:33:25+5:30
ठाणे : जिल्ह्यात आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे निश्चितच ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब ...
ठाणे : जिल्ह्यात आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे निश्चितच ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्यात २४ हजार २१ बेड असले तरी त्यातील केवळ दोन हजार ५७४ बेड फुल असून, तब्बल २१ हजार ४४७ बेड आजघडीला रिकामे आहेत. त्यातही जिल्ह्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी हा आता तब्बल ८१९ दिवसांवर आला आहे. जिल्ह्यात सध्या चार हजार ४४६ रुग्णांवरच प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. परंतु, तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात असल्याने आजही जिल्ह्यात निर्बंध लागू आहेत. पाच लाख ४२ हजार २४० जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून, यातील पाच लाख २७ हजार १६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १० हजार ९५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढताना दिसून आली. परंतु, आता कोरोनाची दुसरी लाटही ओसरू लागल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.२१ टक्के एवढे आहे. तर दीड महिन्यापूर्वी ते ८५ टक्क्यांच्या आसपास होते. मृत्यूचे प्रमाण हे आता २.०१ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे निश्चितच ही समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे. दुसरीकडे रुग्णदुपटीचा कालावधी हा थेट ८१९ दिवसांवर आला आहे. विविध ठिकाणी केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यात यंत्रणांना यश आले आहे.
सध्याच्या घडीला चार हजार ४४६ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू आहेत. यातील एक हजार १६० रुग्ण हे अत्यवस्थ असून, एक हजार ८३३ रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. तर दोन ४६४ रुग्णांमध्ये कोरोनाची कोणत्याही स्वरूपाची लक्षणे आढळलेली नाहीत.
जिल्ह्यात सध्या ५२ कोरोना सेंटर कार्यान्वित आहेत. त्या ठिकाणी २४ हजार २१ बेड असून, त्यातील तीन हजार २११ आयसीयूचे, एक हजार ७४ व्हेंटिलेटरचे आणि १० हजार ५७० बेड हे ऑक्सिजनचे आहेत. त्यानुसार सध्या दोन हजार ५७४ बेड फुल असून, तब्बल २१ हजार ४४७ बेड रिकामे आहेत. यामध्ये जनरल १३ हजार ७९४, ऑक्सिजनचे ९,५७८, व्हेंटिलेटरचे ८७१ आणि आयसीयूचे दोन हजार ५६७ बेड रिकामे असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालयात केवळ २६ रुग्ण
एक वेळ अशी होती की, जिल्हा शासकीय रुग्णालयातही बेड मिळणे कठीण झाले होते. येथे जवळजवळ ३०० च्या आसपास बेड आहेत. त्यातील एकही बेड कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिल्लक नव्हता. परंतु, आजघडीला येथे केवळ २६ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू असून, तब्बल २७४ बेड रिकामे आहेत.