सलग दुसऱ्या वर्षी नववर्ष स्वागत यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:54+5:302021-04-12T04:37:54+5:30
डोंबिवली : गुढीपाडव्यानिमित्त निघणारी नववर्ष स्वागत यात्रा मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे रद्द करण्यात आली होती. यंदाही कोरोनाच्या ...
डोंबिवली : गुढीपाडव्यानिमित्त निघणारी नववर्ष स्वागत यात्रा मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे रद्द करण्यात आली होती. यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्याने मागील वर्षीप्रमाणे स्वागत यात्रा रद्द करण्याचा निर्णय येथील श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी जाहीर केला आहे.
गुढीपाडव्याला नववर्षदिनाचे औचित्य साधत राज्यात सर्वत्र दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. त्याची सुरुवात सर्वप्रथम डोंबिवलीतून झाली. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या पुढाकारातून निघणाऱ्या स्वागत यात्रेचे यंदाचे २२ वे वर्ष आहे. पण गेल्या वर्षीही कोरोनाच्या सावटामुळे स्वागत यात्रा निघाली नव्हती. मंगळवारी गुढीपाडवा असून यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात दररोज दाेन हजारांच्या आसपास नवे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. डोंबिवलीसह राज्यात हा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. कोरोनाच्या संक्रमणावर श्री गणेश मंदिर संस्थानने गुढीपाडव्यानिमित्त निघणारी यंदाचीही स्वागत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नववर्षानिमित्त आयोजित केले जाणारे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यावरही मर्यादा आल्या आहेत; मात्र मंदिरातील धार्मिक कार्यक्रम हे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि कोरोनाचे नियम पाळून केले जातील, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष दामले यांनी दिली.
------------------------------------------------------