ठाण्यात शिवसेनेची गुप्त बैठक! ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर केला दावा
By अजित मांडके | Published: December 7, 2023 04:35 PM2023-12-07T16:35:59+5:302023-12-07T16:36:20+5:30
भाजपकडून वारंवार डिवचले जात असल्याने आता शिवसेनेने देखील आपली रणनिती आखण्यास सुरवात केल्याचेही यातून दिसत आहे.
ठाणे : एकीकडे नागपुरात अधिवेशन रंगत असतांना दुसरीकडे ठाण्यात आनंद आश्रम येथे शिवसेनेची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत भाजपकडून वारंवार कल्याण आणि ठाणे लोकसभेबाबत दावे प्रतिदावे केले जात असल्याने त्याच संदर्भात ही बैठक असल्याची माहिती शिवसेनेतील वरीष्ठ सुत्रांनी दिली. त्यातही या बैठकीत आता केवळ ठाणे, कल्याणच नाही तर आता भिवंडी लोकसभेवरही दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी लोकसभेतील आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख आणि महिला जिल्हा प्रमुख आदींसह इतर महत्वाचे पदाधिकारी होते अशी माहिती देखील सुत्रांनी दिली. एकूणच भाजपकडून वारंवार डिवचले जात असल्याने आता शिवसेनेने देखील आपली रणनिती आखण्यास सुरवात केल्याचेही यातून दिसत आहे.
ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात बुधवारी रात्री ही बैठक घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील आदींसह ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघरमधील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. राज्यात शिवसेना आणि भाजप हातात हात घालून काम करीत असतांना दुसरीकडे ठाण्यात आजही भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाºयांकडून एकमेकांवर चिखलफेक किंवा दावे प्रतिदावे केले जात आहेत. मागील काही दिवसांपूर्वी हे वादळ काहीसे शांत झाल्याचे दिसत होते. मात्र काही दिवसांपूर्वी कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभेवरुन शिवसेनेला डिवचले होते.
यापूर्वी देखील भाजपच्या काही नेत्यांकडून ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा करण्यात आला होता. मात्र असे असतांना शिवसेना युतीचा धर्म पाळत आहे. त्यांच्याकडून कुठेही अशा प्रकारची वक्तव्ये केली जात नसल्याचे या बैठकीत अनेकांनी सांगितले. मात्र असतांनाही भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून अशा पध्दतीने युती धर्मात बिब्बा टाकण्याचे काम का केले जात आहे? असा सवालही काहींनी या बैठकीत केल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे अशा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या जातील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच शिवसेनेच्या या गुप्त बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांना हात घातल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीत अशा पध्दतीने खलबते सुरु असतांनाच भाजप जर ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा करीत असेल तर भिवंडीत देखील शिवसेनेची ताकद असल्याने ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर देखील या बैठकीत दावा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. एकूणच भाजपकडून केले जात असलेल्या दाव्यांना आता शिवसेनेने देखील उत्तर देण्याची तयारी सुरु केल्याची या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाणे असेल किंवा कल्याण, भिवंडी आदी ठिकाणी मोर्चे बांधणी करण्यासाठी कामाला लागा असे आदेशही या बैठकीतील वरीष्ठांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील या बैठकीत चर्चा झाली.
- नरेश म्हस्के - प्रवक्ता, शिवसेना