नागरिकांनी गांभीर्याने कोरोनाचे नियम न पाळल्यास कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 09:15 PM2021-02-18T21:15:32+5:302021-02-18T22:10:59+5:30
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांंनी केले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा आढावा घेऊन कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांंनी केले आहे. रुग्णसंख्या अशीच वाढली तर मात्र सध्या लागू केलेल्या कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे करणार असल्याचा इशाराही फणसळकर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिला.
उपनगरी रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी काही वेळांकरीता सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येतही काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर भाजी बाजार, रेल्वे स्थानक, बस स्थानक याठिकाणीही मोठी गर्दी वाढू लागली आहे. शिवाय, बस आणि रिक्षांमधूनही सर्रास जादा प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. ‘मास्कशिवाय, प्रवेश नाही’ असा फलक जरी बसवर असला तरी अनेक प्रवासी हे रिक्षा आणि बसमधून विना मास्क प्रवास करीत आहेत. नागरिकांमधील गांभीर्यता कमी होत असल्यामुळेच कोरोना हा साथीचा आजारही डोके वर काढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा आढावा घेऊन कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे केली जाणार आहे. सध्या या कलमानुसार पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास, जमा होण्यास बंदी आहे. पण, यामध्येही रेस्टॉरन्ट, बॅक्वेट हॉल अशा ठिकाणी शिथिलता आणली आहे. सध्या, सिनेमागृह, बॅक्वेट हॉल हे क्षमतेच्या ५० टक्के अनुमतीने सुरु केले आहेत. लग्न समारंभालाही १०० पेक्षा जास्त वºहाडी मंडळींना अनुमती नाही. या सर्व नियमांबरोबरच सामाजिक अंतर ठेवणे, मास्क लावणे आणि स्वच्छता हे नियम नागरिकांनी आवर्जून पाळण्याचे आवाहनही फणसळकर यांनी केले आहे.