धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी
By admin | Published: July 3, 2017 06:19 AM2017-07-03T06:19:52+5:302017-07-03T06:19:52+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक काँग्रेस, समाजवादी पक्ष, भारिपसारख्या समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून लढवण्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक काँग्रेस, समाजवादी पक्ष, भारिपसारख्या समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यासाठी प्रदेशस्तरावर चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्षही येत्या आठवडाभरात निश्चित होण्याची शक्यता असून माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह निरीक्षकांनी रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
खासदार, आमदार निवडून येण्यासह मीरा- भार्इंदर महापालिकेत १५ वर्षांत तीन वेळा महापौरपद भूषवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था दयनीय आहे. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सांसह अनेक नगरसेवक, जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून भाजपा, शिवसेना व काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
स्थानिक नेतृत्वच न राहिल्याने अखेर माजी पालकमंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांनी आता पक्षाची धुरा हाती घेतली आहे. पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमधून ६० जणांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज भरले आहेत.
नाईक यांच्या भार्इंदर येथील कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी निरीक्षक दिनकर तावडे, सोनल पेडणेकर आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी, यासाठी तशी आधीपासूनच बोलणी सुरू झाली होती. पण, जिल्हाध्यक्ष जयंत पाटील, सुरेश दळवी आदींचे अंतर्गत मतभेद होऊन ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत एकाही पॅनलमध्ये लढत देणारा प्रबळ असा उमेदवार दिसत नाही.
परिणामी, काँग्रेस आघाडी करेल याबद्दल साशंकता आहे. त्यातही शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढत असल्याने जातीयवादी पक्षांविरुद्ध काँग्रेसशी आघाडी करण्यास राष्ट्रवादी तयार आहे. शिवाय, भारिप व समाजवादी पक्षासोबत आघाडीची बोलणी नाईक यांच्याकडून सुरू आहेत, तर काँग्रेससोबत आघाडीची बोलणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडी होणार का याकडे लक्ष लागलेले आहे.
उमेदवारांची यादी काँग्रेसला देणार
पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी देणार आहोत. काँग्रेसने आघाडी नाही केली; तर अन्य मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागेल, असे संजीव नाईक यांनी सांगितले. आम्ही आमची प्रभागानुसार यादी करून काँग्रेसला देणार आहोत. त्यावर, जागावाटप व आघाडीची चर्चा होईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.