कल्याण रेल्वे स्थानकातील हमाल, सफाई कामगार, स्टॉलधारकांना सतर्कतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 07:56 PM2019-03-02T19:56:57+5:302019-03-02T20:01:25+5:30
२० हमाल, १३ उपाहारगृह चालक, सफाई कर्मचाऱ्यांची बैठक
डोंबिवली: जंक्शनचा दर्जा असलेल्या कल्याणरेल्वे स्थानकातून नासिक, पुण्याच्या दिशेने अप-डाऊन दोन्ही दिशांना दिवसाला सुमारे १९४ लांबपल्याच्या गाड्या धावतात. त्या गाड्यांपैकी बहुतांशी गाड्या कल्याण स्थानकात थांबतात. त्यामधून हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकाला रेल्वे प्रशासन सर्वाधिक महत्व देते. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने शुक्रवारनंतर दिलेल्या विशेष हाय अलर्टच्या माध्यमातून स्थानकातील हमाल, उपाहारगृह चालक, कर्मचारी, आणि सफाई कामगार आदींसह सर्व यंत्रणांना रेल्वे पोलिस दलाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, तसे कोणी आढळल्यास त्यासंदर्भात तात्काळ फलाटांमध्ये कार्यरत असणाऱ्या सुरक्षा यंत्रणेला सूचित करावे असे सांगण्यात आले आहे. स्थानकात सुमारे २० हमाल असून दोन्ही शिफ्टमधील ४० सफाई कामगार व सात फलाटांमधील १३ उपाहारगृह चालक, त्यांचे कर्मचारी आदींची एकत्रित बैठक घेण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे काटोकोरपणे पालन करण्यासंदर्भात सर्वांना सांगण्यात आले. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सगळयाच घटकांनी सहकार्य करावे, सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे.
स्थानकातील सीसी टीव्ही कंट्रोल रूम मधील पोलिस कर्मचा-यांनाही फलाटांमधील सर्व कानाकोपऱ्यांमध्ये लक्ष ठेवावे, संशयित हालचाली आढळल्यास तातडीने अलर्ट करून समस्येवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानकात ठराविक वेळांनी फलाट क्रमांक १ ते ७ या सर्व ठिकाणी पादचारी पूल, स्वच्छतागृहे, उपाहारगृह, कच-याचे डबे, प्रवाशांचे सामान, यांसह सर्वच ठिकाणी डॉग स्क्वॉड पथक तपासणी करत आहे. हँड डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. फलाट ४, ५,६ व तसेच ७ वर येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सतर्क असून प्रवाशांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.