भिवंडी पालिकेची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:09 AM2018-10-01T05:09:22+5:302018-10-01T05:09:44+5:30
भिवंडी - महापालिका इमारतीच्या लौकिकाला डाग लागेल, अशी गेल्या काही महिन्यांतील तिसरी घटना मागील आठवड्यात घडली. इमारतीच्या कम्पाउंडला लागून एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याबाबत, पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांंना खुलासा करता आलेला नाही, त्यामुळे मुख्यालयाच्या परिसरातील सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात कापआळी येथे महापालिकेचे सात मजली मुख्यालय आहे. या मुख्यालयाच्या खिडकीतून काही वर्षांपूर्वी एका काश्मिरी तरुणाने उडी मारून आत्महत्या केली होती. हा तरुण कोठून इमारतीत शिरला आणि त्याने कोणत्या मजल्यावरून उडी मारली, याबाबतचे चित्रण पालिकेच्या कॅमेºयात बंदिस्त न झाल्याने या प्रकरणावर अखेरपर्यंत प्रकाश पडला नाही. पालिकेचे तत्कालीन अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा केला नाही. सुरक्षा ठेकेदारावर पांघरूण घालण्याचे काम केले गेले. त्यापूर्वी इमारतीत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने पालिकेतील काही दक्ष अधिकाºयांनी आणि नगरसेवकांनी सुरक्षारक्षकांत वाढ करून इमारतीच्या पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वारच बंद करून टाकले. मागील दाराने सर्व कारभार सुरू ठेवला. पालिकेच्या कामकाजाची वेळ जरी सायंकाळी ६ वाजेपर्यंत असली, तरी या इमारतीत मोठे अधिकारी आणि ठेकेदार यांची रात्री उशिरापर्यंत लगबग सुरू असल्याने इमारतीमधील दिव्यांचा झगमगाट १२ वाजेपर्यंत सुरू राहायचा. याचा गैरफायदा घेत काहींनी आपली चारचाकी वाहने पालिकेच्या आवारात उभी करणे सुरू केले होते. त्यापैकी एक तरुण रात्री आवारात गाडी उभी करून परतत असताना इमारतीच्या कम्पाउंडचा मागील लोखंडी दरवाजा अंगावर कोसळून तो जागीच मरण पावला. ही घटना या मार्गावरून जाणाºया रिक्षाचालकांनी पाहून पोलिसांना खबर दिली होती. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने पूर्वेचे मुख्य प्रवेशद्वार उघडले नाही. आयुक्त ई. रवींद्रन व आयुक्त योगेश म्हसे यांनी इमारतीचे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार सुरू केले. याखेरीज, खाजगी सुरक्षाव्यवस्था बंद करून महाराष्ट्र सुरक्षाबल मागवून त्यांच्या हातात इमारतीची सुरक्षा सोपवली. या सुरक्षारक्षकांवर अधिकारी म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी एस.डी. चव्हाण यांची नियुक्ती केली. इमारतीच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे नियंत्रण सुरक्षा कार्यालयाां ठेवले. कॅमेरा आणि त्याचे नियंत्रण करण्याचा ठेका जावेद अली अन्सारी यांना देण्यात आला.
महापालिका इमारतीच्या कम्पाउंडबाहेर दररोज बेवारस गाड्या उभ्या राहत असून काही खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या या कम्पाउंडलगत दररोज उभ्या केल्या जातात. अशा खाजगी गाड्यांच्या आडोशाचा आधार घेत गुलाम नबी शेख (४५) या रिक्षाचालकाने पालिकेच्या कम्पाउंडमधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा मार्ग रहदारीचा असल्याने घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. ही माहिती जवळच असलेल्या निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाल्याने ते घटनास्थळी पोहोचले. या घटनेबाबत मृत व्यक्तीच्या भावाने निजामपूर पोलीस ठाण्यात नोंद केली. मात्र, पालिकेच्या सुरक्षा अधिकारी व सुरक्षारक्षकांनी कातडीबचाव धोरण स्वीकारले. या घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्याकरिता पालिकेच्या आवारातील कॅमेरे तपासले असता मृत व्यक्तीची हालचाल टिपणारा कॅमेरा बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे रिक्षाचालकाची हत्या की आत्महत्या, यावर पोलिसांना आजतागायत प्रकाश टाकता आलेला नाही. सुरक्षा अधिकारी चव्हाण यांचा सुरक्षारक्षकांवर वचक नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. परिणामी, पालिकेच्या इमारतीला सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळी गस्त घालत नाहीत. त्यामुळे विविध घटना घडतात.
भिवंडी महापालिका मुख्यालयाची सुरक्षा खासगी सुरक्षायंत्रणेकडून काढून घेऊन महाराष्ट्र सुरक्षाबलाकडे सोपवली. मात्र, त्यामुळे काहीच फरक पडला नाही. मुख्यालयातील झाडाला मागील आठवड्यात एका रिक्षाचालकाने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमका त्याच भागातील सीसीटीव्ही बंद असल्याने फुटेज प्राप्त झाले नाही. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, त्याचा उलगडा झालेला नाही.