जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची सुरक्षा चार नाका कामगारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:52 AM2018-03-23T00:52:15+5:302018-03-23T00:52:15+5:30
जानेवारी महिन्यात ठाणे जिल्हा सामान्य (शासकीय) रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेल्यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली होती. त्यानंतर, विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे १५-२० सुरक्षारक्षक मिळावेत, अशी मागणी केल्यानंतर मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली.
- पंकज रोडेकर
ठाणे : जानेवारी महिन्यात ठाणे जिल्हा सामान्य (शासकीय) रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेल्यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली होती. त्यानंतर, विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे १५-२० सुरक्षारक्षक मिळावेत, अशी मागणी केल्यानंतर मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. परंतु, अद्यापही २० सोडाच एकही सुरक्षारक्षक मिळाले नसल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने आपल्याच स्तरावर चार नाका कामगार रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासकीय रुग्णालयातील चार सुरक्षारक्षकांपैकी दोनच सध्या तैनात आहेत. त्यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याने त्यांची तारेवरची कसरत होते. त्यातच, त्यांची नियुक्ती लेबरवॉर्ड (प्रसूती) येथे दोन शिफ्टमध्ये केली असल्याने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते अन्य वॉर्डाची सुरक्षा वाऱ्यावर आहे.परिणामी, मध्यंतरी रुग्णालयात चोरीचे तसेच गर्दुल्ल्यांच्या उपद्रवाचे प्रकार वाढले होते. रविवार, १४ जानेवारी रोजी पहाटे रुग्णालयातून चार तासांच्या बाळाला एका महिलेने पळवले. त्यावेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेºयांवर रुग्णालयाची सुरक्षा अवलंबून होती. सुदैवाने पोलिसांनी काहीच तासांत त्या महिलेला अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली.त्यावेळी रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. प्रशासनाने डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर ५० सुरक्षारक्षक मिळावेत,असा प्रस्ताव शासनदरबारी पाठवल्याचे स्पष्ट केले होते. तसेच बाळचोरीच्या घटनेनंतर आ. फाटक यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन खाजगी सुरक्षारक्षक मिळावेत,अशी मागणी केली. त्याचा नवा प्रस्ताव आरोग्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. त्यालाही आता दोन महिने होऊन गेले असून अद्याप एकही सुरक्षारक्षक रुग्णालयाला मिळालेला नाही.
दरम्यान, रुग्णालयातील सुरक्षेवर कुणी बोट ठेवू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने चार नाका कामगारांना शिफ्टमध्ये निगराणीला ठेवले आहे. त्यांच्याकडे ना सुरक्षारक्षकांचे कपडे ना, सुरक्षेचे प्रशिक्षण अशा सुरक्षारक्षकांच्या हाती रुग्णालयाच्या सुरक्षेचा गाडा हाकला जात आहे. तसेच काही वेळेस या चार नाका कामगारांपैकी एकाला प्रसूती वॉर्डजवळ तैनात केले जाते. परंतु, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे स्वप्न दाखवणारे सुरक्षेच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत आहेत.
पुन्हा झाला चोरीचा प्रयत्न
मंगळवारी पहाटे नाका कामगार गेटवर असताना दंतरोग चिकित्सक विभागाची काच फोडून चोरीचा प्रयत्न झाला. सुदैवाने त्यावेळी काही गेले नाही. पण, ज्यांना सुरक्षेचा गंध नाही, असे लोक मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक म्हणून ठेवले, तर चोरीच्या घटना घडणारच, अशी चर्चा रुग्णालयात उघडउघड होऊ लागली आहे.