अंबरनाथ नगरपालिकेचा सुरक्षा अधिकारी अडगळीत
By पंकज पाटील | Published: October 3, 2023 07:04 PM2023-10-03T19:04:52+5:302023-10-03T19:05:24+5:30
नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये सुरक्षा अधिकाऱ्याला जागा नाही
अंबरनाथ- अंबरनाथ नगरपालिकेने तब्बल 45 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे. या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये काही अधिकाऱ्यांना भव्य असे कार्यालय थाटून देण्यात आले आहे. तर काही अधिकाऱ्यांना शौचालयाच्या बाजूला मीटर रूममध्ये कार्यालय थाटून देण्यात आले आहे. पालिकेचे सुरक्षा अधिकारी यांना एका लहानशा मीटर रूम मध्येच कार्यालय दिल्याने पालिकेचा गलथन कारभार समोर आला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत केवळ तीन ते चारच सुरक्षारक्षक हे पालिकेच्या पेरोलवर कार्यरत आहेत. उर्वरित सर्व सुरक्षारक्षक हे महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाकडून पाठवण्यात आले आहेत. पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाकडून आलेले रक्षक यांची सर्व जबाबदारी सांभाळण्यासाठी मुख्य सुरक्षा रक्षकाची जबाबदारी पालिकेतील किशोर धुमाळ या अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. धुमाळ हे दिव्यांग असल्यामुळे त्यांना तळमजल्यावरच कार्यालय देणे अपेक्षित होते. मात्र हे कार्यालय देताना जागा न मिळाल्याने लिफ्टच्या शेजारी असलेल्या मीटर रूममध्ये त्यांना एक जुना टेबल देऊन त्या ठिकाणी बसविण्यात आले आहे.
शहरातील पालिकेच्या मालमत्ताची जबाबदारी ज्या सुरक्षारक्षकांवर आहे त्या सुरक्षारक्षकांच्या अधिकाऱ्याला अडगळीत बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला योग्य जागा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून त्या इमारतीमध्ये जागा अपुरी पडत असल्यामुळे अनेक विभाग इतरत्र हलवण्यात आले आहे. त्यातच सुरक्षारक्षकाच्या अधिकाऱ्याला मीटर रूममध्ये कार्यालय थाटून दिल्याने नवीन प्रशासकीय इमारत काय कामाची असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
घरपट्टी विभागात कर्मचाऱ्यांचे हाल
अंबरनाथ नगरपालिकेची मालमत्ता वसुली करणाऱ्या घरपट्टी विभागात एकाही अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्यांना वातानुकूलित यंत्रणा दिलेली नाही. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही उकाड्यात रांगेत उभे राहावे लागत आहे.