मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर ‘मातोश्री’च्या धर्तीवर सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 08:41 AM2022-07-04T08:41:05+5:302022-07-04T08:41:29+5:30
सहपोलीस आयुक्तांनी घेतला आढावा, शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानाला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या धर्तीवर ठाणे पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. याच सुरक्षाव्यवस्थेचा ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी आढावा घेतला.
शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अजून तरी त्यांनी मुंबईतील वर्षा हे शासकीय निवासस्थान ताब्यात घेतलेले नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासह मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थानांच्या धर्तीवरच आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी निवासस्थानाभोवतीही पोलिसांचे विशेष सुरक्षाकवच उभारले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा असल्यानेही या सुरक्षेची विशेष खबरदारी घेत असल्याची माहिती ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. या सर्व पार्श्वभूमीवर ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव आदींनी आढावा घेतला.
अशी राहणार सुरक्षाव्यवस्था
पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली तब्बल १२५ हून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा या निवासस्थानाभोवती दिवसरात्र तैनात राहणार आहे. यात दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्याही तैनात राहणार आहेत. शिवाय, सीसीटीव्ही, वॉच टॉवर, मेटल डिटेक्टर, पायलट व्हॅन यांचाही समावेश राहणार आहे.
... तर सुरक्षेचे मॅनेजमेंटही
केवळ पोलिसांचे मॅनपॉवरच नव्हे तर सुरक्षेची चोख व्यवस्था कशी राहील, यासाठी त्या भागात येणारे मोर्चे, भेटीसाठी येणारे कार्यकर्ते यावर नियंत्रण राहण्यासाठी संपूर्ण परिसरातील रस्ते आणि आणि सीसीटीव्हींचा आढावा कराळे यांनी घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. या ठिकाणी आता चोख बंदोबस्त राहणार आहे. मनुष्यबळाबरोबरच तांत्रिक उपकरणांचाही यासाठी विशेष उपयोग केला जाणार आहे. - डॉ. पंजाब उगले, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे