केडीएमसीतील विरोधकांची अळीमिळी गुपचिळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:48 AM2017-08-03T01:48:58+5:302017-08-03T01:48:58+5:30
केडीएमसीत मंगळवारी सत्ताधारी शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर विरोधकांचे टीकास्त्र सुरू झाले आहे. असे असले तरी पालिकेतील विरोधीपक्षांची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.
कल्याण : केडीएमसीत मंगळवारी सत्ताधारी शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर विरोधकांचे टीकास्त्र सुरू झाले आहे. असे असले तरी पालिकेतील विरोधीपक्षांची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. प्रशासनाचा उदासीन, भोंगळ कारभार आणि शिवसेना-भाजपा युतीतील कुरघोडीचे राजकारण यातही विरोधकांचा प्रभाव फारसा पडत नसल्याने विरोधीपक्ष गेले कोणीकडे?, असा सवाल उपस्थित होत आहे. विरोधाची भूमिका मांडली जाते, मात्र कालांतराने तो विरोध फिका पडत असल्याने विरोधकांची ‘अळीमिळी गुपचिळी’ असे काहीसे चित्रही पहावयास मिळते.
केडीएमसीत विरोधी पक्षांचा एक इतिहास आहे. आतापर्यंत भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विरोधीपक्षाची बजावलेली भूमिका निश्चितच प्रभावी होती. २० वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षाची भूमिका बजावली. सत्ताधारी आणि प्रशासनाने आणलेल्या चुकीच्या धोरणांना विरोध करणे हे प्रमुख काम विरोधी पक्षाचे असते. परंतु, आता तसे होत नाही. वरवरचा विरोध दिसत असल्याने विरोधकांची एकंदरीतच भूमिका संशयाच्या भोवºयात सापडत आहे.
२०१० मध्ये प्रथमच महापालिका निवडणूक लढवणाºया आणि विरोधी पक्षनेतेपद पटकावणाºया मनसेने प्रारंभी विरोधीपक्ष म्हणून बजावलेली भूमिका ही वाखाणण्याजोगी होती. कालांतराने त्यांच्याविरोधाची धार बोथट झाली. हे चित्र आजच्या घडीला सुरुवातीपासून प्रकर्षाने जाणवत आहे. हे त्यांचे नेतेही कबूल करतात.
केडीएमसीत मनसे हा प्रमुख विरोधीपक्ष असलातरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आजच्याघडीला विरोधात आहे. परंतु, त्यांचा विरोध कणभरही दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे. उलट या विरोधकांमध्येच एकमत नसल्याने याचा फायदा सत्ताधारी उठवताना दिसतात. यात सत्ताधाºयांवर अंकुश सोडाच, त्यांच्या चुकांकडे पुरते दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव पहावयास मिळत आहे.
आक्रमकता नाही, ही वस्त्ूुस्थिती
मनसे सभागृहात आक्रमक होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. हे गेल्या सहा वर्षांपासूनचे आमचे दुर्देव आहे. रस्त्यावर आंदोलने छेडली जातात, तेव्हा नगरसेवक सहभागी होत नाहीत. तसेच याचे पडसादही सभागृहात उमटत नाहीत, हे वास्तव आहे अशी प्रतिक्रिया मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.
प्रभाव जाणवत नाही, हे मान्य
महापालिकेत आमचे जेमतेम चार नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांनी विरोध केला तरी त्याचा प्रभाव जाणवत नाही, हे मान्य आहे. मनसे हा प्रमुख विरोधीपक्ष आहे. त्यांनी सर्वाधिक विरोध केला पाहिजे. आमच्याकडे त्यांनी पद द्यावे. आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.