डोंबिवली संमेलन अधिक देखणे
By admin | Published: March 20, 2017 01:57 AM2017-03-20T01:57:24+5:302017-03-20T01:57:24+5:30
संमेलन हे मनोरंजनाचे साधन नाही. काही वर्षांत महामंडळाचे संमेलनावरील नियंत्रण सुटून गेले आहे. ते पुन्हा आणून देण्याचे काम
डोंबिवली : संमेलन हे मनोरंजनाचे साधन नाही. काही वर्षांत महामंडळाचे संमेलनावरील नियंत्रण सुटून गेले आहे. ते पुन्हा आणून देण्याचे काम या संमेलनाने केले. महामंडळाने केलेल्या सूचनांचे पालन या संमेलनात झाले. दिखाऊपणा नसलेले पण देखणे, असे हे संमेलन ठरले, अशा शब्दांत महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी कौतुक केले.
नव्वदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच डोंबिवलीत झाले. हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण व्हावे, यासाठी अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला. ज्यांनी या संमेलनाला सहकार्य केले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वेश सभागृहात रविवारी कृतज्ञता सोहळा झाला. संमेलन यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेल्या ६०० जणांचा सत्कार करण्यात आला. लवकरच स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून त्यात सर्व देणगीदारांचा उल्लेख केला जाणार आहे. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, महामंडळाचे पदाधिकारी प्रकाश पायगुडे, सह्याद्री वाहिनीचे जयू भाटकर, आबासाहेब पटवारी, कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते.
जोशी म्हणाले, संमेलनाच्या इतिहासात या संमेलनाने कूस बदलली आहे. प्रथमच या संमेलनाचे आयोजन एका समाजाकडे देण्यात आले. स्वत:चा आर्थिक किंवा राजकीय फायदा करून घेण्याचा विचार या समाजाने केला नाही. हे संमेलन मराठी समाजाचे प्रतीक आहे. मूठभर नागरिकांची मक्तेदारी नाही, हे यातून दाखवून दिले.
डॉ. काळे म्हणाले, कृतज्ञता हा शब्द महत्त्वाचा आहे. माणसात अनेक गुण असतात, पण कृतज्ञता नसते. सर्व घटकांत एकात्मता होती. अशाप्रकारची विलक्षण कृतज्ञता फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. पिंपरी-चिंचवडला संमेलन झाल्यावर डोंबिवलीत संमेलन घेणे, हे एक आव्हानच होते. सामान्य माणसाने दिलेली २५ हजारांची देणगीसुद्धा मला सरकारच्या २५ लाखांपेक्षा मोठी वाटते, असे त्यांनी सांगितले.
साहित्य व नाट्यसंमेलन या नगरीत झाल्याने साहित्य व नाट्यविषयक चळवळ डोंबिवलीतून सुरू व्हावी, अशी सूचना प्रकाश पायगुडे यांनी केली. गुुलाब वझे म्हणाले, संमेलनासाठी निधी जमा करताना निवडणूक आचारसंहिता व नोटाबंदीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. साहित्यिकविषयक कार्यक्रमाची इच्छा होती, असे ते म्हणाले. प्रास्ताविक शरद पाटील व सूत्रसंचालन दीपाली काळे यांनी केले. (प्रतिनिधी)