बदलापूरच्या आंदोलकांना त्रास होणार नाही असे पाहा; राज ठाकरेंचं पोलिसांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:59 AM2024-08-29T05:59:09+5:302024-08-29T05:59:23+5:30

गुन्हे दाखल झालेल्यांच्या कुटुंबियांशी राज ठाकरेंनी केली चर्चा.

See that the Badlapur agitators are not disturbed Raj Thackerays appeal to the police | बदलापूरच्या आंदोलकांना त्रास होणार नाही असे पाहा; राज ठाकरेंचं पोलिसांना आवाहन

बदलापूरच्या आंदोलकांना त्रास होणार नाही असे पाहा; राज ठाकरेंचं पोलिसांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी बदलापूरमध्ये येऊन मनसेच्या महिला पदाधिकारी आणि आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्यांच्या  कुटुंबियांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी पोलिसांशी चर्चा करून आंदोलकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरमधील प्रक्षुब्ध नागरिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर मनसेच्या महिला पदाधिकारी, पालक आणि नागरिकांवर गुन्हे दाखल केले होते. या आंदोलनात रेल रोको केल्याबद्दल रेल्वे पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून, त्यात रात्री-बेरात्री नागरिकांना उचलून नेल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या.  त्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्याशी फोनवरून चर्चा केली, तसेच कुणालाही त्रास होता कामा नये, असे आवाहन त्यांना केले.  शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली, तसेच ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, अशा आंदोलकांशीही चर्चा केली.

- बदलापुरात राज ठाकरे येणार असल्यामुळे त्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभागृहात जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी केली जात होती. ज्या सभागृहात राज ठाकरे येणार होते त्या सभागृहाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. या ठिकाणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

- राज ठाकरे यांच्यासमोर आपल्या तक्रारी मांडण्यासाठी अनेक पालक सभागृहात उपस्थित होते. मात्र, काही महिला पालकांशी राज ठाकरे यांनी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांसोबत बोलण्यासाठी ते सभागृहात गेले.

- राज ठाकरे पुन्हा येतील या आशेवर सर्व पालक आणि कार्यकर्ते सभागृहातच उपस्थित होते. मात्र, पोलिसांसोबत चर्चा झाल्यानंतर ठाकरे हे सभागृहात न येता परस्पर परतीच्या प्रवासाला निघून गेले.

- सभागृहात जमलेले पालक आणि गुन्हा दाखल झालेले आंदोलक पत्रकारांशी कोणत्याही मुद्यावर बोलायला आणि प्रतिक्रिया द्यायला टाळाटाळ करत होते. हे प्रकरण वाढवू नये एवढीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: See that the Badlapur agitators are not disturbed Raj Thackerays appeal to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.