किन्हवलीत कापलेली रोपे पावसात भिजली; शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 02:42 AM2019-10-22T02:42:56+5:302019-10-22T02:43:19+5:30
हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, कापणीच्या हंगामास झाली सुरूवात
- वसंत पानसरे
किन्हवली: तालुक्यातील किन्हवली भागासह ग्रामीण भागात भात कापणीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. परंतु चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने कापलेली भात रोपे भिजून ती कुजण्याच्या अवस्थेत आहेत. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी धास्तावला आहे.
शहापूर तालुक्यात १४ हजार हेक्टर भू क्षेत्रात भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील अशी अपेक्षा असताना ऐन सुगीच्या हंगामात पाऊस पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातपिकाला पूरक असा पाऊस झाल्याने गेल्या कित्येक वर्षांत शेतकऱ्यांना बघायला मिळाले नव्हते असे दर्जेदार पीक आले होते.
सहा ते सात दिवस पावसाने उघडीप दिल्याने भात कापणीच्या हंगामास सुरूवात झाली होती. पेरणीपासून१२० ते १३० दिवसांनी पिकणाºया गरवा प्रकारच्या भाताच्या प्रजातीसाठी पाण्याची थोडीफार गरज असली तरी १०० ते ११० दिवसांनी पिकणाºया हलवार जातीसाठी पाणी गरजेचे नाही.
शेतकºयांनी सोसायटीचे कर्ज काढून बि-बियाणे व खते विकत आणून शेती लावली आहे. कापलेली भातरोपे डोळ््यादेखत पाण्यावर तरंगत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेले पिकही जाणार असल्याने गोड घासही कडू लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय यंत्रणा कामात व्यस्त आहेत. यामुळे नुकसानीचे पंचनामे कोण करणार असा सवाल शेतकरी करत आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी कार्यालयातील सर्व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असून पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल देणे अशक्य आहे.
- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर
सतत चार दिवस पडत असलेल्या पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. कापलेली रोपे भिजून पेंढा काळा पडेल व भाताचे दाणे कुजणार असल्याने निवडणुकीनंतर तरी पंचनामे व्हावेत.
- मुकुंद गायकर, शेतकरी,चरीव