झाडे जगविण्यासाठी ठाण्यात बनविणार सीड्स बॉम्ब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:34 AM2019-07-24T00:34:53+5:302019-07-24T06:55:32+5:30
वृक्ष जोपासण्याचा असाही उपक्रम : श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाचा पुढाकार
ठाणे : नष्ट होत चाललेल्या झाडांना वाचविण्यासाठी ठाण्यात सीड्स बॉम्ब तयार केले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थी, पालकांकडून फळांच्या बिया गोळा केल्या जाणार आहेत. ओसाड पडत चाललेल्या जमिनीवर हे सीड्स बॉम्ब फेकून तिथे जंगल तयार करण्याचा मानस आहे. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाने ते तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जवळपास एक लाखांच्यावर सीड्स बॉम्ब तयार केले जाणार आहेत.
सिमेंट काँक्रिटच्या जंगलात झाडे नष्ट होत चालली आहेत. झाडे लावण्यासाठी आणि लावलेली झाडे जगविण्यासाठी मंडळाने हा उपक्रम हाती घेतला असून यंदाचे हे तिसरे वर्षे आहे. सोमवारपासून विद्यार्थी, पालक, परिसरातील रहिवाशांपासून १० आॅगस्टपर्यंत बिया गोळा केल्या जाणार आहेत. याच लोकांच्या मदतीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सुटीच्या दिवशी श्रीरंग विद्यालयाच्या आवारात ते तयार केले जाणार आहे. मंडळाचे पदाधिकारी प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. ते बनविताना मोठी बी असेल तर ती एक आणि लहान बिया असेल तर दोन - तीन बिया घेऊन हे तयार केले जात आहे. आम्ही ते विकत नाहीत, वृक्षप्रेमी तसेच, ज्या सामाजिक संस्थांना ते रुजवायचेच त्यांनाच दिले जातात. जिथे पावसाने माती नरम झाली असेल तिथेच हे बाँब फेका अशा सूचना दिल्या जातात आणि शक्यतो ओळखीच्या ठिकाणी फेकल्यास नंतर जाऊन ते झाड किती मोठे झाले हेदेखील पाहता येते असे सावंत यांनी सांगितले. याआधी येऊर येथेही ते रुजविण्यात आले होते. गणेशोत्सवात गणरायाच्या पाया पडायला येणाºया मान्यवरांना हे सीड्स बाँब भेट म्हणून दिले जाण्याचा पायंडा या मंडळाने पाडला आहे. या उपक्रमामुळे लहान मुलांना बिया साठविण्याची सवय लागेल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.
सीडस बॉम्बचे साहित्य : फळझाडांच्या बिया, माती आणि खत
दोन वर्षांत सव्वा लाखांच्यावर बाँब बनविले. पहिल्या वर्षी ४० हजार तर दुसºया वर्षी ६० ते ७० हजार बाँब बनविले. या वर्षी ठाण्यातील एका डॉक्टरांनी मुरबाडला घेतलेल्या जागेत ३० हजार बाँब रुजविले जाणार आहेत.