बेडरुममध्ये साप पाहून नागरिकाने 'नगरसेवकालाच' फोन केला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:24 PM2021-10-22T22:24:31+5:302021-10-22T22:25:03+5:30
नगरसेवकानेच धरला साप, उल्हासनगरातील इमारतीच्या फ्लॅटमधील घटना
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ हिललाईन पोलीस ठाणे परिसरातील गोल्डन पॅलेस इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये बुधवारी मध्यरात्री शिरलेल्या सापाला चक्क नगरसेवक भारत गंगोत्री यांनी पकडले. त्यावेळी कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला असून साप अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आला. उल्हासनगरातील गोल्डन पॅलेस इमारतीत राहणारे कुमार श्यामदासानी यांच्या बेडरूम बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान साप दिसल्याने, एकच खळबळ उडाली होती.
कुमार यांनी स्थानिक नगरसेवक भारत गंगोत्री यांना फोन करून बेडरूममध्ये साप शिरल्याचे सांगितले. गंगोत्री यांनी कुमार यांचे घर गाठून घटनेची माहिती अग्नीशमन विभागाला दिली. त्यादरम्यान साप कुठे जाऊ नये म्हणून, गंगोत्री यांनी जीव धोक्यात घालून सापाचा शोध बेडरूम मध्ये घेवून, साप हाताने पडून बॉटलमध्ये ठेवला. साप पकडल्याने कुटुंबांनी निःश्वास सोडला असलातरी, भर वस्तीत साप आलाच कसा?. असा प्रश्न कुमार श्यामदासानी यांच्या कुटुंबासह नगरसेवक भारत गंगोत्री, अग्निशमन दलाच्या जवानांना पडला आहे.
महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्यावर, नगरसेवक भारत गंगोत्री यांनी पकडलेला साप त्यांच्या ताब्यात दिला. अग्निशमन दलाच्या जवानांनी साप सर्प मित्राच्या मदतीने, सापाला अंबरनाथ येथील जंगलात सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. नगरसेवक भारत गंगोत्री यांना साप पकडण्याचा कोणताही अनुभव नसतांना, संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी साप सुरक्षितरीत्या पकडून अग्निशमन दलाच्या जवानाकडे दिला. याप्रकारने गंगोत्री यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.