इच्छुकांची झाली शिवसेनेमध्ये भाऊगर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:06 AM2017-07-21T03:06:33+5:302017-07-21T03:06:33+5:30
अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पण पालिकेत आमचीच सत्ता येणार
धीरज परब। लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पण पालिकेत आमचीच सत्ता येणार असा दावा करणाऱ्या भाजपाकडून केवळ २५२ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आणि त्यापैकी २५ जणांनी भरून दिले आहेत. शिवसेनेकडून ५४० इच्छुकांनी अर्ज नेले असून २१० जणांनी भरून दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे सध्यातरी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी असल्याचे दिसत आहे.
शिवसेना, भाजपाकडून उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू झाले आहे. भाजपाच्या अर्जाची किमत तीन हजार; तर शिवसेनेची पाच हजार आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यालयात अर्ज नेण्यासाटी इच्छुकांची झुंबड उडाली. देशात भाजपाला मिळालेले यश पाहता पालिकेतही आमची सत्ता येईल, असा दावा केला जात आहे. ७० जागा जिंकू असा विश्वासही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र अर्ज नेणाऱ्यांची संख्या पाहता भाजपाला निवडणूक सोपी राहिलेली नाही. त्यांच्यात गटबाजी मोठी आहे. मेहतांनी विश्वासातील काहींना परस्पर प्रचाराला लागण्याच्या सूचना दिल्याने बंडाळी वाढण्याची चिन्हे आहेत. उलट शिवसेनेकडून अर्ज नेणाऱ्या इच्छुकांची संख्या भाजपापेक्षा दुप्पट आहे. माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांचा शिवसेनेतील प्रवेश आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे, अरूण कदम यांचे टीमवर्क दिसू लागल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जाते.
मीरा-भाईंदरमधील भाजपाचे सर्वेसर्वा आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी बळावते आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या माणसांकरवी तेथील घडामोडींवर वॉच ठेवला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील यांना तेथे पाठवले. पण मूळात अनेक कारणांनी, कार्यपद्धतीने मेहता सतत वादग्रस्त बनत आहेत. समाजातील अनेक घटकांचा रोष त्यांनी ओढावून घेतला आहे. त्यामुळे तेथील इच्छुकांचा ओढा कमी झाल्याचे मानले जाते.
भाजपाने अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस उद्याचा म्हणजे गुरूवार ठेवला असून शिवसेनेने शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू होतील. ही पालिका निवडणूक मेहता आणि सरनाईक यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्वाची असल्याने दोघांनीही कंबर कसली आहे.
भाजपाकडून महापौर गीता जैन, गटनेते शरद पाटील, डिम्पल मेहता, नगरसेवक अॅड. रवी व्यास, प्रभात पाटील, सुरेश खंडेलवाल, अनिल भोसले यांनी अर्ज नेले आहेत. प्रभाग ५ मधून विद्यमान नगरसेविका मेघना रावल यांच्यासह पती दीपक यांनीही अर्ज घेतला. माजी नगरसेवक गजानन भोईर व त्यांचा मुलगा गणेश यांनी प्रभाग चारमधून इच्छुक म्हणून अर्ज घेतले. शिवाय माजी पालिका अधिकारी अजित पाटील, पदाधिकारी संदीप तलवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही अर्जासाठी गर्दी केली होती. काहींनी दोन- दोन प्रभागातून लढण्याची तयारी केली आहे.
वास्तविक एका इच्छुकास फक्त दोनच अर्ज देणे बंधनकारक असताना बिल्डर दिलीप पोरवाल यांचा मुलगा गौरव याला चक्क तीन अर्ज देण्यात आले. प्रभाग क्र . ६, ८ व १ मधून पोरवाल यांनी अर्ज घेतले. ही बाब आमदार नरेंद्र मेहतांच्या निदर्शनास येताच त्यांनी एक अर्ज पोरवाल यांच्याकडून परत घेण्याची सूचना जिल्हाध्यक्षांना दिली. भाजपाच्या अर्जात प्राथमिक माहिती तसेच पक्षाचे किती प्राथमिक व सक्रीय सदस्य केले त्याची यादी जोडायची आहे. पक्षात कधी पासून सक्रिय आहात, उमेदवार म्हणून तुमच्या जमेच्या बाजू काय हे भरुन द्यायची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना कॅशलेस व्यव्हाराचा आग्रह धरला आहे. पण पालिका निवडणुकीसाठी पक्षाचे इच्छुक उमेदवार म्हणून अर्जासाठीचे तीन हजार मात्र रोखीने घेण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल पावणे सात लाखाची रक्कम जमा झाली. त्यामुळे मोदींच्या कॅशलेस धोरणाला भाजपाकडूनच हरताळ फासला जात आहे.
सेनेचे दळवी भाजपात?
मीरा रोडच्या शांतीनगर प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दळवी यांनी भाजपाकडून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज नेला आहे. भाजपाच्या दीप्ती भट यांना सेनेत प्रवेश दिल्यानंतर मेहताही सेनेला धक्का देणार असे बोलले जात आहे. हा त्याचाच परिपाक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आॅनलाईन, नेट बँकिंगद्वारे इच्छुकांकडून अर्ज शुल्क घेण्याची प्रक्रिया व त्याची नोंद ठेवणे अवघड ठरेल म्हणून रोखीने शुल्क घेतले. पण गोळा झालेली रक्कम लगेच खात्यात जमा करण्यात येते.
- यशवंत आशिनकर,
कार्यालय प्रमुख.