पप्पु कलानी यांच्यानंतर सीमा कलानी चर्चेत; उल्हासनगर महापालिका निवडणुक रिंगणात उतरण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 06:00 PM2021-10-14T18:00:22+5:302021-10-14T18:00:39+5:30
उल्हासनगरचे राजकारण गेल्या तीन दशकापासून कलानी कुटुंबा भोवती फिरत आहे.
उल्हासनगर : शहरातील राजकारण कलानी कुटुंबाचा दबदबा असून पेरॉलवर बाहेर आलेले पप्पु कलानी शहरभर दौरे करीत सुटले आहे. या दरम्यान पप्पु कलानी यांची मोठी मुलगी सीमा कलानी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत नगरसेवक व कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक मनोज लासी यांनी दिले.
उल्हासनगरचे राजकारण गेल्या तीन दशकापासून कलानी कुटुंबा भोवती फिरत आहे. यादरम्यान पप्पु कलानी सलग ४ वेळ आमदार पदी निवडून आले असून त्यापैकी २ वेळा ते जेल मध्ये असतांना आमदार पदी निवडून आले. तर एक वेळा त्यांच्या धर्मपत्नी ज्योती कलानी आमदार पदी निवडून आल्या होत्या. तर पप्पु कलानी व ज्योती कलानी यांनी नगरपालिका वेळी नगराध्यक्ष पद भूषविले. ज्योती कलानी व त्यांच्या सून पंचम कलानी प्रत्येकी एक वेळा महापौर पदी निवडून आल्या. तर ज्योती कलानी सलग ७ वर्ष महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी होत्या. एकूणच कलानी कुटुंबा भोवती शहरातील राजकारण फिरत असून महापालिका सत्ता मिळविण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांनी कलानी महलचे उंबरठे झिजविले आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना शासन धोरणामुळे पप्पु कलानी यांना कोविड मुळे पेरॉल मिळाला.
पेरॉलवर सुटलेले कलानी यांनी शहरभर दौरे करून निवडणूक वातावरण तयार करून विरोधकांना घाम फोडला. तर मुलगा ओमी कलानी राजकारणात सक्रिय असून सून पंचम कलानी नगरसेवक आहेत. गेल्या दोन दिवसापासून मुलगी सीमा कलानी शहर दौऱ्यावर दिसत असून त्या महापालिका रिंगणात उतरणार असल्याचे संकेत नगरसेवक व कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक मनोज लासी यांनी दिले. यापूर्वी भाजप, काँग्रेस, शिवसेना पक्षांनी अस्पृश्य ठरविलेल्या कलानी कुटुंबाचा राजकीय स्विकार करून कलानी महलाचे उंबरठे झिजविण्यात धन्यता मानत आहेत. पप्पु कलानी त्यांच्या धर्मपत्नी व राष्ट्रवादी पक्षाच्या तत्कालीन आमदार व शहरजिल्हाध्यक्ष पदी असतांना, त्यांचा एकुलता एक मुलगा ओमी कलानी यांनी गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी ओमी कलानी टीमचे स्थापना करून भाजप सोबत महाआघाडी केली. त्यानंतर शिवसेने सोबत सत्तेत गेले.
शहरात सीमा कलानी बाबत उत्सुकता
पेरॉलमुळे जेल बाहेर असलेले पप्पु कलानी हे कधीही जेल मध्ये जाऊ शकतात. असेच दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या धर्मपत्नी ज्योती कलानी यांचे दुःखद निधन झाले. मुलगा ओमी व मुलगी सीमा यांना राजकीय बळ देण्यासाठी दिवस-रात्र शहर दौरे करीत असून सीमा कलानी यांना निवडणुक रिंगणात उतरविण्याचे संकेत दिले.