जलसंपदा विभागाची भूकंपमापन यंत्रणा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:35 PM2019-12-17T23:35:04+5:302019-12-17T23:35:11+5:30

भंगारात फेकल्याची शक्यता : भातसा धरणासह परिसरातील गावखेड्यांचीही सुरक्षा धोक्यात

The seismic system of the Water Resources Department disappears | जलसंपदा विभागाची भूकंपमापन यंत्रणा गायब

जलसंपदा विभागाची भूकंपमापन यंत्रणा गायब

Next

रवींद्र सोनावळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेणवा : शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून बसविण्यात आलेली बंद अवस्थेतील भूकंपमापन यंत्रणा पडझड झालेल्या इमारतीतून गायब झाली आहे. ही यंत्रणा भंगारात फेकून देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रात भूकंपमापन यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने भातसा धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भातसा धरण क्षेत्रात व परिसरातील खर्डी ,वाशाळा ,लाहे येथे १९८४-८५ मध्ये बसविण्यात आलेल्या ३ भूकंपमापन यंत्रणा ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने ही उपकरणे आता कालबाह्य झाल्याने नादुरूस्त अवस्थेत होती. यातील एक भूकंपमापन केंद्र भातसा धरण प्रकल्प वसाहतीजवळ होते. मात्र ते दुरूस्तीअभावी बंद पडले. भातसानगर, वाशाळा, लाहे येथील नादुरु स्त व बिघाड झालेली भूकंपमापन यंत्रे बंद पडली आहेत. ही यंत्रे बंद पडण्यापूर्वी वेळीच बदलणे गरजेचे आहे व येथे आता डिजिटल व अद्ययावत भूकंपमापन यंत्र बसविणे गरजेचे आहे, असा लेखी पत्रव्यवहार भातसा धरणाचे उपअभियंता यू .एस .हावरे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व अभियांत्रिकी संशोधन संस्थेस कळविले होते. मात्र जलसंपदा विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे व सरकारी अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे भूकंपमापन यंत्रणा अखेर बंद पडली आहे. भातसा धरण परिसरात ज्या ठिकाणी हे यंत्र बसविले होते त्या इमारतीची आता पडझड झाली आहे.
यंत्र बसविण्यात आलेल्या खोलीचे लोखंडी दरवाजे ,खिडक्या चोरीला गेले असून बाहेरील छत कोसळले आहे. दरवाजे नसल्याने या खोलीत उंदीर, घुशी, कुत्रे ,मोकाट जनावरे यांनी मुक्काम ठोकला आहे. येथील बंद पडलेले भूकंप मापन यंत्रही गायब झाले असून अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अतिसंवेदनशील असलेल्या भातसा धरणाजवळ होणाºया हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणाच येथे सध्या अस्तित्वात नाही.
भातसा धरण क्षेत्राजवळ असलेल्या खर्डी व परिसरात १९८२ च्या काळात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळेस भूकंपाच्या भीतीने घाबरलेल्या खर्डी, लाहे, भातसानगर परिसरातील गावपाड्यातील नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने अन्यत्र स्थलांतर केले. यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. खर्डीपासून हाकेच्या अंतरावर भातसा जलाशय आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील भूकंपमापन यंत्रणाच मृत अवस्थेत असल्याने धरणासह गावखेड्यांची सुरक्षा धोक्यात आहे.

भातसा धरण क्षेत्रात तातडीने भूकंपमापन यंत्र बसविण्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअर रिसर्च इन्स्टिट्यूटकडे आम्ही पत्रव्यवहार केला असून भातसा धरण व परिसरात एकूण ७ भूकंपमापन यंत्र बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
- योगेश पाटील,
कार्यकारी अभियंता,
भातसा जलसंपदा विभाग

Web Title: The seismic system of the Water Resources Department disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.