काळ्याबाजारात विक्रीस जाणारे रेशनचे नऊ टन धान्य पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:39+5:302021-06-03T04:28:39+5:30

भिवंडी : रेशनिंग दुकानांवर गरीब लाभार्थींना पुरवण्यात येणारा गहू, तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ...

Seized nine tonnes of ration grains for sale on the black market | काळ्याबाजारात विक्रीस जाणारे रेशनचे नऊ टन धान्य पकडले

काळ्याबाजारात विक्रीस जाणारे रेशनचे नऊ टन धान्य पकडले

Next

भिवंडी : रेशनिंग दुकानांवर गरीब लाभार्थींना पुरवण्यात येणारा गहू, तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी पडघा येथील वजनकाट्यासमोर घडली.

पडघा परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार हे आदिवासी, गोरगरीब लाभार्थींना धान्य न देता त्याची प्रमाणात काळ्याबाजारात विक्री करतात, अशी माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई - नाशिक महामार्गावरील वजनकाट्यावर सापळा लावला असता एक आयशर टेम्पो धान्याने भरलेल्या गोण्यांचे वजन करण्यासाठी आला. त्याचा चालक छोटू यादव याच्याकडे गहू, तांदळाच्या खरेदी पावत्या मागितल्या असता त्याने बोगस पावत्या दाखवून सुटका करण्याचा प्रयत्न केला. टेम्पोत वेगवेगळ्या कंपन्यांची छपाई असलेल्या गोण्या आढळल्या. या गोण्यांमध्ये रेशनिंगचा गहू, तांदूळ असल्याचा संशय बळावल्याने श्रमजीवी कार्यकर्त्यांनी तहसीलदार अधिक पाटील व पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर घटनास्थळी तालुका पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे व पडघा पोलिसांचे पथकाने तत्काळ पोहचून त्वरित पंचनामा केला असता टेम्पोत ५० किलो वजनाच्या गव्हाच्या १०० गोण्या तर तांदळाच्या ६० गोण्या अशा एकूण सुमारे नऊ टन वजनाच्या दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे धान्य आढळले.

- गोदाम मालक सचिन सतीश बिडवी यांचा माफीनामा

हा गहू व तांदूळ पडघा येथील धान्य व्यापारी सचिन सतीश बिडवी यांच्या गोदामातून भरल्याची कबुली चालक छोटू यादव याने दिली. पंचनामा सुरू असताना रेशनिंग दुकानदार अशोक पाटील रा. आमणे व अशोक भोईर रा.धामणगाव यांनी घटनास्थळी येऊन धान्य व्यापारी सचिन बिडवी यांना एकवेळ माफ करा, अशी विनवणी केली. त्यामुळे या काळ्याबाजारातील धान्य विक्रीत या दोघा रेशनिंग दुकानदारांचा सहभाग असावा, असा संशय लोणे यांनी पंचनाम्यात व्यक्त केला आहे.

-पोलिसांची रेशन दुकानदारांना नोटीस

पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे यांनी सदरचे धान्य व टेम्पो पडघा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. टेम्पोमालक बाळू शेठ रा.कल्याण व चालक छोटू यादव रा.उत्तर प्रदेश यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करून रेशन दुकानदारांना पडघा पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

Web Title: Seized nine tonnes of ration grains for sale on the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.