वयाच्या ४४ व्या वर्षी 'मिस्टर वर्ल्ड'साठी निवड; उल्हासनगरच्या बॉडीबिल्डरची जागतिक भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 03:20 PM2022-05-27T15:20:06+5:302022-05-27T15:25:01+5:30
बॉडीबिल्डिंगची लहानपणीपासूनच आवड असल्यानं वयाच्या २१ व्या वर्षीपासून म्हणजे आजपासून २३ वर्षांपूर्वी त्यांनी व्यायामाला सुरुवात केली.
उल्हासनगर: ध्येय गाठण्याची जिद्द आणि आत्मविश्वास असेल, तर वयाचा अडसर कधीच येत नाही, हे उल्हासनगरच्या एका बॉडीबिल्डरने दाखवून दिलंय. कारण वयाच्या ४४ व्य वर्षी या बॉडीबिल्डरची मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी निवड झालीये. त्यामुळं त्याच्या तब्बल २३ वर्षांच्या मेहनतीचं चीज झाले आहे.नरेश पंजुमल नागदेव असं या ४४ वर्षीय बॉडीबिल्डरचं नाव असून ते उल्हासनगरमध्ये वास्तव्याला आहेत.
बॉडीबिल्डिंगची लहानपणीपासूनच आवड असल्यानं वयाच्या २१ व्या वर्षीपासून म्हणजे आजपासून २३ वर्षांपूर्वी त्यांनी व्यायामाला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात त्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. सध्या नरेश हे ४० वर्षांवरील वयोगटात बॉडीबिल्डिंग करत असून आत्तापर्यंत त्यांनी मास्टर महाराष्ट्र श्री स्पर्धेत सिल्व्हर मेडल, मिस्टर इंडिया स्पर्धेत सिल्व्हर मेडल आणि वेस्टर्न मिस्टर इंडिया स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं आहे. त्यानंतर नुकताच त्यांनी हिमाचल प्रदेशात झालेल्या मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठीच्या सिलेक्शनमध्ये सहभाग घेतला. या दोन्ही स्पर्धांसाठी त्यांची निवड झालीये.
सदर निवड झाल्याबद्दल उल्हासनगरच्या त्यांच्या जिममध्ये सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. आणि त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिशय कठोर मेहनतीच्या जोरावर आपण इथवर पोहोचलो असून भविष्यात भारतासाठी मेडल जिंकून उल्हासनगरचं नाव देशात आणि जगात पोहोचवायचं असल्याचं ते म्हणाले. तर राष्ट्रवादीच्या नेत्या सोनिया धामी, भरत गंगोत्री यांनीही नरेश यांना शुभेच्छा दिल्या.
सध्याची युवा पिढी नशेच्या आहारी जात असून त्यांनी नरेश यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असं यावेळी त्यांनी सांगितलं. नरेश यांची ज्या स्पर्धांसाठी निवड झाली आहे, त्यापैकी मिस्टर एशिया स्पर्धा ही जुलै महिन्यात मालदीवमध्ये, तर मिस्टर वर्ल्ड स्पर्धा डिसेंबरमध्ये थायलंडमध्ये होणार आहे. नरेश यांचा आजवरचा प्रवास हा सध्याच्या युवापिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावा लागेल.