‘आरटीई’ प्रवेशासाठी 542 विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:22 AM2020-11-20T01:22:38+5:302020-11-20T01:23:39+5:30
२३ नोव्हेंबरपर्यंत मुदत : शिक्षण विभागाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिकांसह पाच तालुक्यांमधील ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये आरटीईखालील २५ टक्के शालेय प्रवेशासाठी प्रतीक्षायादीतील ५४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत दिली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते केजीच्या वर्गात या बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्या बालकांची निवड झाली आहे, त्यांचे शालेय प्रवेश दिलेल्या शाळेत जाऊन निश्चित करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी पालकांना केले आहे. यासाठी निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेजद्वारे कळविला जाईल. परंतु, पालकांनी या मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर ‘प्रवेशाची तारीख’ या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहण्याचे मार्गदर्शनही पालकांना करण्यात येत आहे.
प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी शाळेत गर्दी करू नये. प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्याबरोबर नेऊ नये. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांनी प्रवेश घेताना कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन नियमांचे पालन करणे
आवश्यक आहे.
पुरेशा तयारीने शाळेत जा
nप्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र आणि ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पालकांनी शाळेत घेऊन जावे.
nप्रतीक्षायादीमधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्याकरिता स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर यानंतर दिल्या जाणार आहेत.